इचलकरंजी / प्रतिनिधी
खून केल्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने मर्डरचे एक वर्ष पूर्ण, आता दुसऱया वादळाची तयारी, अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटस् ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न येथील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला होता. हा प्रकार पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, त्याचा खुनाच्या गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करावा, असा अर्ज न्यायालयात केला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने `त्या’ गुन्हेगाराचा जामीन रद्द केला. आकाश संजय वासुदेव (वय 27, रा. भोने माळ, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
पिंगळे म्हणाले, येथील स्टेशन रोडवरील खंजिरे औद्योगिक वसाहतीच्या पेट्रोल पंपानजीक 10 डिसेंबर 2019 रोजी दिपक कोळेकर याचा खुन झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेवसह त्याच्या बारा साथिदारांविरोधी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. हे सर्वजण काही महिने जेलची हवा खाऊन सध्या जामीनावर बाहेर आले आहेत. या दरम्यान या गँगचा म्होरक्या वासुदेव याच्यावर 13 नोव्हेंबर रोजी खुनी हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होते. यातून तो पूर्ण बरा झाल्यावर त्याने पुन्हा आपले गुन्हेगारी कारनामे सुरु ठेवले. याच दरम्यान त्याने कोळेकरच्या खूनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने मर्डरचे एक वर्ष पूर्ण, आता दुसऱया वादळाची तयारी, अशा आशयाचा व्हिडीओ मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातून तब्बल 1 महिन्याची कारागृहाची हवा खावून तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. याच दरम्यान पोलिसांनी वासुदेव कोळेकर खून प्रकरणी त्याला मिळालेला जामिन रद्द करावा, याबाबत न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्याचा मंजुर केलेला जामिन अर्ज रद्द केला. ही माहिती समजताच त्याने इचलकरंजीतून पलायन केले असून, पोलिसानी त्याचा शोध सुरु केला आहे.