प्रतिनिधी / निपाणी :
आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जखमींना रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रक्त न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असे मानत निपाणीत महादेव गल्लीतील श्री गणेश मंडळ हेल्थ क्लबतर्फे प्रत्येकवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गेल्या 10 वर्षात तब्बल 1100 बाटल्या रक्ताचा संग्रह करून गरजूंपर्यंत ते पोहोचवण्यात सदर मंडळाला यश आले आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्याचे कौतुक होत आहे.
येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात श्री गणेश मंडळ हेल्थ क्लबचा दहावा वर्धापनदिन शनिवारी पार पडला. यावेळी मंडळाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी केले. निपाणी पीकेपीएसचे अध्यक्ष महेश बागेवाडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
एकाच दिवशी 105 बाटल्या रक्त संग्रह
यावेळी बोलताना चंद्रकांत कोठीवाले यांनी श्री गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या 10 वर्षात इतक्या मोठय़ा प्रमाणात शिबिराच्या माध्यमातून रक्तसंग्रह करून रोटरी क्लबमार्फत गरजूंपर्यंत पोहोचवून आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. यावेळी मंडाळाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांचा रक्तदान शिबिरातील योगदानाबद्दल निपाणी पीकेपीएसच्यावतीने सत्कार करण्यात आला. सदर शिबिरात एकाच दिवशी सुमारे 105 बाटल्या रक्त संग्रहीत करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रकांत तारळे, डॉ. एम. आर. पाटील, सुरेश शेट्टी, शिवकुमार सदलगे, वज्रकांत सदलगे, डॉ. आय. एन. ढोले, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, गणेश खडेद, सुजय शहा, श्रेणिक मेहता, मनोहर आडीपवाडे, शिवरुद्र पाटील, गणेश पट्टणशेट्टी, आर. सी. पाटील, सदानंद चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, महारुद्र भालेभालदार, रविंद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, आनंद पणदे, शेखर चंदूरे, चंद्रकांत पाटील, आनंद सोलापूरकर, सचिन देशमाने, अनिल पाटील, दयानंद कोठीवाले, डॉ. महेश ऐनापूरे यांच्यासह एस. पी. गुप व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.