प्रतिनिधी /वास्को
आल्त दाबोळीतील वाहतुक सिंग्नलपासून काही अंतरावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीने रस्ता दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. मयत युवकाचे नाव रामू पोवार(41) असे असून तो झुआरीनगरातील राहाणारा आहे.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास झाला. मयत युवक झुआरीनगरातून दाबोळी विमानतळाच्या दिशेने आपल्या ऍक्टीवा दुचाकीवरून जात होता. अन्न पदार्थ घरी पोहोचवणाऱया एका आस्थापनासाठी तो काम करीत होता. आल्त दाबोळीतील वालीस जॅक्शनवरील वाहतुक सिग्नलपासून काही अंतरावर तो अपघातात सापडला. दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने त्याने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.