प्रतिनिधी / वडूज :
स्टॉक मार्केटच्या माध्यमातून 105 दिवसांत पैसे दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून कोडूमुलाईल जोसेफ अब्राहम (वय 69,रा.बलवंत पार्क वडूज) यांची फसवणूक केल्याप्रकरणी निरंजन महेश कुलकर्णी (रा.सोमवार पेठ कराड) याला वडूज पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. याप्रकरणी आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार अब्राहम हे एका नामांकित टायर कंपनीमधून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून, सध्या ते त्यांच्या मुलीकडे वडूज येथे रहण्यास आहेत. यातील संशयित कुलकर्णी व तक्रारदार यांचे जावई यांची ओळख असल्याने त्याचे त्यांच्याकडे येणे जाणे असायचे. त्या ओळखीच्या माध्यमातून कुलकर्णी याने अब्राहम यांचा जावई व मुलीला स्टॉक मार्केटमध्ये काही पैसे गुंतवण्यास भाग पाडले व त्यांना त्यांचा दुप्पट परतावा देखील दिल्याने तक्रारदार यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर कुलकर्णी याने तक्रारदार यांनाही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची गळ घालून त्यांना 105 दिवसांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. अब्राहम यांनी सेवानिवृत्तीनंतर आलेले 14 लाख 6 हजार पाचशे रूपये कुलकर्णी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे गुंतवले. अब्राहम यांनी कुलकर्णी याला बँक खात्यातून काही रक्कम ट्रान्सफर केली होती तर तीन लाख रूपये रोख स्वरुपात दिले होते. कुलकर्णी याने दिलेली मुदत संपल्यानंतर अब्राहम यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी अब्राहम यांना दोन धनादेश दिले होते ते दोन्ही धनादेश कुलकर्णींच्या खात्यावर पैसे नसल्याने परत आले. कुलकर्णींकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अब्राहम यांनी वडूज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन तातडीने कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या. वडूज पोलीस अधिक तपास करत आहेत.