प्रतिनिधी/ सातारा :
कोरोना विषाणू संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या सत्रात शासनाने थोडी ढील दिल्याने सातारा जिल्हय़ात लोक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्स पाळणे महत्वाचे असताना व अद्याप जिल्हय़ात बाधित रुग्ण समोर येत असताना शासनाने काही दुकाने सुरु करतानाच दारु दुकानांना परवानगी दिल्याने शासनाच्या या निर्णयाचा दलित विकास महिला मंडळाच्या अध्यक्षा ऍड. वर्षा देशपांडे यांनी निषेध केला आहे.
शहरात सकाळी 10 वाजल्यापासून दारु दुकाने सुरु झाली. मात्र दारु खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पहाटेपासून रांगा लावल्याचे चित्र सातारकरांनी अनुभवले. दारु विक्री बंद असल्याने लॉकडाऊनच्या काळात दारुचा प्रचंड काळाबाजार होत असल्याने शासनाने दारु दुकानांना परवानगी दिली असली तरी यामुळे व्यसनाधिनताच वाढणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही यामुळे निर्माण होत असल्याने ऍड. वर्षा देशपांडे यांनी त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह प्रत्येक दारु दुकांनासमोर शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
जनता लॉकडाऊन, व्यवसाय लॉकडाऊन मग दारु दुकाने सुरु का, देशी, विदेशी दारु आहे सर्वनाशी, दारु दुकाने करणाऱया शासनाचा निषेध असे फलक घेवून ऍड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हे आंदोलन करत शासनाचा निषेध केला. यावेळी ऍड. शैला जाधव यांच्यासह महिला व युवक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.