प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 50 हजारांचा आकडा ओलांडून गेली असली तरी त्यापैकी 49,523 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या बाधित वाढीची संख्या मंदावत असतानाच दुसरीकडे जगभरातून लस तयार झाल्याच्या व ती लवकरच वितरित होण्याच्या बातम्या दिलासा वाढवत आहेत. मात्र, अंतिम टप्प्यातील लढाईत नागरिक बेफिकीर झाल्याचे बाजारपेठांमध्ये दिसत असून मास्क, सॅनिटाईजरचा वापर आणि सुरक्षित अंतर याचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या जिल्हय़ात अनुभवास मिळत आहे. हे चित्र काळजी वाढवणारे आहे.
दरम्यान, सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 116 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
56 कोरोनामुक्त : एक सुध्दा नमुना तपासणीला नाही
सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार 56 नागरिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 49,579 एवढी झाली आहे. दिलासादायक परिस्थितीतील अहवालात रविवारी पहिल्यांदाच एक देखील संशयिताचा नमुना तपासणीस पाठवला गेला नाही. त्यामुळे सोमवारच्या अहवालात नवीन रुग्ण वाढीची संख्याही चांगलीच मंदावलेली दिसेल.
‘फायझर’ने मागितली लस वापराची परवानगी
दिवसभरात रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोविड-19च्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचे दिलासदायक वृत्त झळकले. त्यातच भारताच्या नागरिकांसाठाही दिलासा देणारे वृत्त माध्यमांनी दिले आहे. औषध निर्मिती कंपनी फायझरच्या भारतीय शाखेने आपल्या कोविड लसीच्या वापरासाठी औपचारिक मंजुरीसाठी भारतीय औषधी महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. औषध नियामकाला केलेल्या अर्जात कंपनीने देशात लस आयात करणे आणि वितरणाशी संबंधित मंजुरी देण्याविषयी अर्ज केला आहे.
सातारा शहर, तालुक्यात वाढती संख्या
सध्या जिल्ह्यात सर्व तालुक्यात कमी, जास्त संख्येने बाधित समोर येत आहेत. मात्र, यामध्ये सातारा शहर व तालुक्यात शनिवारी रात्रीच्या अहवालात 67 बाधितांची संख्या समोर आली असून ती चिंता वाढवणारी आहे. फलटणमध्ये 37 बाधित समोर आलेत तर कराडमध्ये वेग चांगलाच मंदावलाय तर इतर उर्वरित तालुक्यात देखील बाधितांची संख्या कमी येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सातारा व फलटणकरांनी काळजी घेण्याची गरज वाढली आहे.
लसीकरणाची चर्चा अन् बाजारपेठेत बेफिकीरी
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये येणाऱ्या लसींची व होणाऱ्या लसीकरणाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे बाधितांची संख्या मंदावू लागलीय. मात्र सातारा, फलटण, कराडमध्ये त्याचा आलेख स्थिर नाही. कमी जास्त प्रमाणात रुग्ण समोर येत असताना जिल्ह्यात बहुतांशी बाजारपेठांमध्ये काहीजण चक्क विनामास्क हिंडत आहेत. तर सुरक्षित अंतराचा बोजवारा उडून गेलाय. लढाई अंतिम टप्प्याकडे असताना व काळजी घेण्याची गरज असताना संख्येने कमी पण काही टक्के नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे.
9 बाधितांचा मृत्यू : ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात बनगरवाडी, ता. माण 88 वर्षीय पुरुष, अंबवडे, ता. खटाव 75 वर्षीय पुरुष, जावळी, ता. फलटण 45 वर्षीय पुरुष तसेच जिल्हयातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये लोणंद ता. खंडाळा 70 वर्षीय महिला व 69 वर्षीय पुरुष, मारीपेठ, ता. महाबळेश्वर 70 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगांव 60 वर्षीय महिला, जळगांव ता. कोरेगाव 70 वर्षीय महिला, गावडेवाडी, ता. पाटण 44 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असून सध्या थंडीचा कडाका वाढू लागला असताना सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
रविवारची स्थिती
एकूण बेड ………..6,009
एकूण उपचारार्थ …..627
दाखल रुग्ण ………..596
होम आयसोलेट ……31
रिक्त बेड ………5,382
कोरोना केअर सेंटर
(क्षमता 3,295 पैकी दाखल 144)
रिक्त बेड 3,151
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(2,714 क्षमतेपैकी दाखल 627)
रिक्त बेड 2,087
दवाखान्यात दाखल 627 पैकी
ऑक्सिजनशिवाय : 140 (क्षमता 711)
रिक्त 571
ऑक्सिजनसह : 344 (क्षमता 1,541) रिक्त 1,197
आयसीयू : 85 (क्षमता 462) रिक्त 377
रविवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 2,56,182
एकूण बाधित 52,063
एकूण कोरोनामुक्त 49,579
मृत्यू 1,741
उपचारार्थ रुग्ण 743
रविवारी
एकूण बाधित 116
एकूण मुक्त 56
एकूण बळी 09