मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेच्या मतदानासाठी आज सकाळी सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत दिल्लीत 5.60 टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 70 जागांसाठी होणाऱया या निवडणूकीत 672 उमेदवार रिंगणात आहेत. आज होणाऱया मतदानात त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 13 हजार 750 मतदान केंद्रांवर हे मतदान होईल.
दिल्लीतील 1 कोटी 46 लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 81 लाख 5 हजार 236 पुरुष, 66 लाख 80 हजार महिला 11 हजार 608 सेवारत तर 869 तृतियपंथींचा समावेश आहे.
या निवडणुकीच्या रेसमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय व आतिशी, भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आदी रिंगणात आहेत.
2015 मध्ये आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती. यंदाच्या निवडणुकीत केजरीवाल 70 पैकी 50 ते 55 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येतील, असा विश्वास आम आदमी पक्षाने व्यक्त केला आहे.