झळाळत्या आयपीएल चषकावर पाचव्यांदा कब्जा
वृत्तसंस्था/ दुबई
ट्रेंट बोल्टची (3-30) भेदक गोलंदाजी व रोहित शर्माच्या (51 चेंडूत 68) झुंजार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा झळाळत्या आयपीएल चषकावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. दुबईत झालेल्या एकतर्फी अंतिम लढतीत मुंबईने दिल्लीचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 157 धावा केल्या तर मुंबईने 18.4 षटकात 5 बाद 157 धावांसह दमदार विजय संपादन केला. या निकालामुळे दिल्लीचे विजयाचे प्रयत्न व महत्त्वाकांक्षा मात्र अधुरेच राहिले.
विजयासाठी 157 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना मुंबईला विजयासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत. रोहित व डी कॉक (20) यांनी 4.1 षटकात 45 धावांची सलामी दिली. रोहितने नंतर सुर्यकुमार यादवसह (19) दुसऱया गडय़ासाठी 6.4 षटकात आणखी 45 धावा जोडल्या. अर्थात, एका नाटय़मय घडामोडीत रोहित-सुर्यकुमार एकाच एण्डला आले आणि सुर्यकुमार यादवने आपल्या विकेटचा त्याग केला. रोहितने यावेळी एकेरी धावेसाठी कॉल दिला, त्यावेळी सुर्यकुमारचे त्याकडे लक्षच नव्हते. तो फक्त चेंडूच्या दिशेने पाहत राहिला आणि इकडे रोहित अगदी सुर्यकुमारजवळ आला. यानंतर सुर्यकुमारने स्वतः क्रीझ सोडत तंबूत परतणे पसंत केले.
सुर्यकुमार बाद झाल्यानंतर रोहितने आक्रमणावर भर दिला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करत मुंबईला आस्ते-आस्ते विजयाच्या दिशेने आगेकूच करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. नोर्त्जेच्या गोलंदाजीवर अशाच प्रयत्नात त्याने बदली खेळाडू ललित यादवकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला, त्यावेळी मुंबईला विजयासाठी 22 चेंडूत फक्त 20 धावांची आवश्यकता होती.
त्यानंतर किशनने एक बाजू लावून धरताना फटकेबाजीही केली आणि अंतिमतः तो 19 चेंडूत 33 धावांवर नाबाद राहिला. पोलार्ड (9), हार्दिक पंडय़ा (3) स्वस्तात बाद झाले असले तरी तोवर मुंबईचा विजय निश्चित झाला होता. कृणाल पंडय़ाने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीची खराब सुरुवात
आघाडीचे 3 फलंदाज गडगडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (50 चेंडूत नाबाद 65) व ऋषभ पंत (38 चेंडूत 56) यांनी चौथ्या गडय़ासाठी 96 धावांची भागीदारी साकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल फायनलमध्ये निर्धारित 20 षटकात 7 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली. अर्थात, अय्यर व ऋषभ पंत यांच्याशिवाय केवळ धवनलाच (15) दुहेरी धावसंख्या गाठता आली. मुंबई इंडियन्सतर्फे जलद किवीज गोलंदाज ट्रेंट बोल्टने 30 धावात 3 बळी घेतले.
दिल्लीने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आघाडी फळीतील तीन फलंदाज स्वस्तात गारद झाल्याने या संघाला चांगलाच झटका सोसावा लागला. मुंबईचा जलद गोलंदाज बोल्टने स्टोईनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत दिल्लीला जबरदस्त झटका दिला आणि यामुळे दिल्लीची सलामी जोडीच्या अपयशाची डोकेदुखी कायम राहिली. स्टोईनिस येथे बचावात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. पण, त्याचा अंदाज चुकल्यानंतर चेंडू बॅटला स्पर्शून यष्टीमागे गेला आणि डी कॉकने झेल टिपण्यात काहीही कसूर केली नाही.
रहाणेचा खराब फॉर्म या निर्णायक लढतीतही कायम राहिला. तिसऱया स्थानी उतरल्यानंतर बोल्टच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देण्यापूर्वी त्याला केवळ 2 धावा करता आल्या. किंचीत फ्लिक करण्याचा रहाणेचा प्रयत्न होता. पण, चेंडू बॅटीला स्पर्शून मागे गेल्यानंतर डी कॉकने आणखी एक लॉलीपॉप झेल टिपला आणि अर्थातच मुंबईच्या गोटात उत्साह सळसळला. डावखुऱया शिखर धवनचे बाद होणे दिल्लीसाठी आणखी धक्का देणारे ठरले. वास्तविक, धवनने 3 चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली होती. पण, तोच धडाका कायम राखण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून मोठी चूक झाली आणि जयंत यादवच्या चेंडूवर त्रिफळाचीत होत तो तंबूत परतला.
मुंबईने धवनला बाद करण्याचे लक्ष्य समोर ठेवूनच जयंत यादवकडे चेंडू सोपवला होता. यादवने आपली जबाबदारी चोख पार पाडली.
धवन चेंडू स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात होता. पण, चेंडू टप्प्यात येण्यापूर्वीच धवनने बॅट फिरवली आणि येथे अंदाज चुकल्यानंतर यष्टी उद्ध्वस्त झाली.
दिल्लीची पहिली तीन षटके, प्रत्येक षटकात एक फलंदाज तंबूत!
दिल्ली कॅपिटल्सने या निर्णायक लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी. पण, त्यांच्या डावातील पहिल्या तीनही षटकात किमान एक फलंदाज बाद होत राहिला आणि पाहता पाहता 3.3 षटकातच त्यांची 3 बाद 22 अशी दैना उडाली. यातील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टोईनिस बाद झाला, दुसऱया षटकात अजिंक्य रहाणेला विकेट गमवावी लागली आणि तिसऱया षटकात डावखुरा शिखर धवनसारखा मोहरा गडगडला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : मार्कस स्टोईनिस झे. डी कॉक, गो. बोल्ट 0 (1 चेंडू), शिखर धवन त्रि. गो. जयंत यादव 15 (13 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे झे. डी कॉक, गो. बोल्ट 2 (4 चेंडू), श्रेयस अय्यर नाबाद 65 (50 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), ऋषभ पंत झे. हार्दिक पंडय़ा, गो. कोल्टर-नाईल 56 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), शिमरॉन हेतमेयर झे. कोल्टर-नाईल, गो. बोल्ट 5 (5 चेंडूत 1 चौकार), अक्षर पटेल झे. बदली खेळाडू (अनुकूल रॉय), गो. कोल्टर-नाईल 9 (9 चेंडूत 1 चौकार), कॅगिसो रबाडा धावचीत (यादव-कोल्टर नाईल) 0 (0 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 7 बाद 156.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (स्टोईनिस, 0.1), 2-16 (रहाणे, 2.4), 3-22 (धवन, 3.3), 4-118 (ऋषभ पंत, 14.6), 5-137 (हेतमेयर, 17.2), 6-149 (अक्षर पटेल, 19.2), 7-156 (रबाडा, 19.6).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-30-3, जसप्रित बुमराह 4-0-28-0, जयंत यादव 4-0-25-1, नॅथन कोल्टर-नाईल 4-0-29-2, कृणाल पंडय़ा 3-0-30-0, केरॉन पोलार्ड 1-0-13-0.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. बदली खेळाडू (ललित यादव), गो. नोर्त्जे 68 (51 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), क्विन्टॉन डी कॉक झे. पंत, गो. स्टोईनिस 20 (12 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सुर्यकुमार यादव धावचीत (दुबे/पंत) 19 (20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), इशान किशन नाबाद 33 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), केरॉन पोलार्ड त्रि. गो. रबाडा 9 (4 चेंडूत 2 चौकार), हार्दिक पंडय़ा झे. रहाणे, गो. नोर्त्जे 3 (5 चेंडू), कृणाल पंडय़ा नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 4. एकूण 18.4 षटकात 5 बाद 157.
गडी बाद होण्याचा क्रम
1-45 (डी कॉक, 4.1), 2-90 (सुर्यकुमार यादव, 10.5), 3-137 (रोहित, 16.2), 4-147 (पोलार्ड, 17.1), 5-156 (पंडय़ा, 18.3).
गोलंदाजी
अश्विन 4-0-28-0, रबाडा 3-0-32-1, नोर्त्जे 2.4-0-25-2, स्टोईनिस 2-0-23-1, अक्षर पटेल 4-0-16-0, प्रवीण दुबे 3-0-29-0.