किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल व शेल्डॉन कॉट्रेल यांना करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम मोजली. पण, त्या अपेक्षांना हे दोघेही खरे ठरु शकले नाहीत. एकीकडे, मॅक्सवेलने सपशेल निराशा केली तर दुसरीकडे शेल्डॉन कॉट्रेल देखील त्यापेक्षा वेगळा ठरला नाही. पंजाबने ग्लेन मॅक्सवेलसाठी 10.75 कोटी रुपये मोजले तर शेल्डॉनसाठी 8.5 कोटी रुपये मोजले. यापैकी, ऑस्ट्रेलियन मॅक्सवेलने केलेली निराशा किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या अधिक जिव्हारी लागली. मॅक्सवेलने 13 सामन्यात 15.42 च्या सरासरीने केवळ 108 धावा केल्या.यापूर्वी, 2017 मधील हंगामानंतर मॅक्सवेलला पंजाबने वगळले होते. पण, नंतर पुन्हा प्रँचायझींनी त्याच्यावर विश्वास दर्शवला.
‘मॅक्सवेल व शेल्डॉन यांनी संघाची खूपच निराशा केली आणि या उभयतांचे एकंदरीत प्रदर्शन पाहता, त्यांना पुढील हंगामात आणखी संधी देण्यात काहीच हशील नाही’, असे एका सूत्राने याप्रसंगी नमूद केले. या उभयतांबद्दल संघाच्या आढावा बैठकीत विचार करण्यात येईल, असे सध्या सांगण्यात आले आहे.
2021 लिलावाचे आयोजन केले गेले तर त्यात किती बदल करण्याची संधी असेल, यावर देखील बरेच काही अवलंबून असणार आहे. जर मेगा लिलाव झाला नाही तर छोटय़ा लिलावातही किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आपली मध्यफळी व हाणामारीच्या षटकातील गोलंदाजीची बाजू भक्कम करण्यासाठी त्या दृष्टीने खेळाडू निवडण्यावर भर देईल, असे संकेत आहेत.