बेल्लद बागेवाडी-हुक्केरी रस्त्यावरील घटना
प्रतिनिधी/ संकेश्वर
भरधाव दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱया दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 11.30 वाजता बेल्लद बागेवाडी-हुक्केरी रस्त्यावर घडला. बसवराज उर्फ बसवाणी सत्यप्पा संकण्णावर (वय 25, रा. बेळगल्ली, ता. चिकोडी) व बाळेश शिवाप्पा वट्टार (वय 28, रा. शिवापूर, ता. गोकाक) अशी मृतांची नावे आहेत. तर आण्णाप्पा सत्यप्पा संकण्णावर (वय 50) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत बसवराज हे आण्णाप्पासोबत दुचाकीवरुन बेल्लद बागेवाडीहून हुक्केरीकडे येत होते. तर बाळेश हा आपल्या दुचाकीने हुक्केरीकडून बेल्लद बागेवाडीकडे निघाला होता. बाळेशची दुचाकी भरधाव असल्याने चुकीच्या दिशेने जाऊन त्याने बसवराजच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बाळेश जागीच ठार झाला तर बसवराज व आण्णाप्पा गंभीर जखमी झाले. बेळगावच्या केएलई इस्पितळात बसवराजवर उपचार चालू असतानाच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
बसवराज व आण्णाप्पा हे दोघे हुक्केरीच्या जनावर बाजारासाठी येत होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी हुक्केरीचे पोलीस उपनिरीक्षक सिद्रामप्पा उण्णद, हेड कॉन्स्टेबल एस. एस. चिकण्णावर, एस. एस. रेड्डी व सुनील कुंभार यांनी भेट देऊन पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.