वार्ताहर/ खडकलाट
मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास निपाणी-चिकोडी मार्गावर लक्ष्मी क्रॉसनजीकच्या राठोड पेट्रोल पंपासमोर घडली. दीपक पुरंदर दिवाकर (वय 44, रा. संकणवाडी) असे या दुर्देवी व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की, संकणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पुरंदर दिवाकर यांची पत्नी नवलिहाळ ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी उमेदवार असून रविवारी मतदान झाल्यानंतर नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी सौंदलग्याला गेले होते. रात्री 8.30 च्या सुमारास निपाणीहून आपल्या गावी संकणवाडीस येत असताना राठोड पेट्रोल पंपाच्या समोर मोटारसायकलचा ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. यात दीपक यांना जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी खडकलाटचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटुर, आनंद पांडव यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोमवारी सकाळी चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला,
संकणवाडी गावावर शोककळा
दीपक हे सामाजिक कार्यकर्ते होते. संकणवाडी भिमसेना संघटना शाखेचे ते अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्याने संकणवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेची नोंद खडकलाट पोलीस ठाण्यात झाली आहे.