इंग्लंडवर 275 धावांनी मात, रिचर्डसनचे 5 बळी, कांगारू मालिकेत 2-0 ने आघाडीवर
वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत झगडणाऱया इंग्लंडचा दुसऱया कसोटीत 275 धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 103 व 51 धावांची खेळी करणाऱया मार्नस लाबुशानेला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. ऑस्ट्रेलियाने सलग नववी डे-नाईट कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी मिळविली. या डावात रूट (62) व मलान (80) या दोघांनाच अर्धशतकी मजल मारता आली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 9 बाद 230 धावांवर दुसरा डाव घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 468 धावांचे कठीण आव्हान दिले. चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने दुसऱया डावात 4 बाद 82 धावा जमविल्या तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला होता. ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटीतही इंग्लंडच्या फलंदाजांना झगडावे लागले होते. इंग्लंडने 4 बाद 82 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि दिवसातील 21 षटके शिल्लक असताना त्यांचा डाव 192 धावांत आटोपल्याने कांगारूंना दणदणीत विजय मिळाला. हा सामना वाचविण्यासाठी इंग्लंडला उर्वरित फलंदाजांकडून मोठय़ा खेळी करण्याची गरज होती. पण झाय रिचर्डसनसमोर त्यांचे उर्वरित फलंदाज आणखी 110 धावांचीच भर घालू शकले. रिचर्डसनने 42 धावांत 5 बळी मिळविले. लियॉन, स्टार्क यांनी प्रत्येकी 2 तर नेसरने एक बळी मिळविला. पहिल्या कसोटीत त्यांना 9 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे इंग्लंडची ऍशेस ट्रॉफी मिळविण्याची आशाही संपुष्टात आली आहे. यापूर्वी 2010-11 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात शेवटची ऍशेस मालिका जिंकली होती.
तिसरी बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे. 0-2 अशा पिछाडीवर पडल्यानंतरही ऍशेस मालिका जिंकण्याचा प्रसंग यापूर्वी फक्त एकदाच घडला आहे. 1936-37 मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्या संघाने हा पराक्रम केला होता.
चौथ्या दिवशी अखेरच्या षटकात स्टार्कने कसोटीतील अग्रमानांकित फलंदाज जो रूटला बाद केले असल्याने इंग्लंडच्या आशा अष्टपैलू बेन स्टोक्सवर अवलंबून होत्या. या फलंदाजाने यापूर्वी अनेकदा संघाला अडचणीतून बाहेर काढत वाचवले आहे. 2019 मध्ये हेडिंग्ले कसोटीत त्याने सामना जिंकून देणारी खेळी करीत मालिकेतील आव्हान जिवंत राखले होते. पण तशा कामगिरीची पुनरावृत्ती त्याच्याकडून येथे होऊ शकली नाही. त्याने 12 धावांसाठी 77 चेंडू खेळत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. पण लियॉनने त्याला पायचीत करून त्याचे मनसुबे उधळून लावले. पंचांनी त्याला प्रथम नाबाद ठरविले होते. पण ऑस्ट्रेलियाने रिव्हय़ू घेतला आणि त्यात तो पायचीत असल्याचे स्पष्ट झाले. ऑली पोप केवळ 7 चेंडू टिकला. स्टार्कने त्याला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. पहिल्या डावात 5 व या डावात त्याने 4 धावा जमविल्या.
जोस बटलर (26) व ख्रिस वोक्स (44) यांनी प्रतिकार करीत 190 चेंडूत 61 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाला निराश केले होते. पण रिचर्डसनने वोक्सचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला. ऑली रॉबिन्सनने सावध फलंदाजी करीत 8 धावा केल्या. पण लियॉनच्या गोलंदाजीवर स्मिथने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. स्मिथचा हा सामन्यातील सहावा झेल होता. बटलर 35 षटके मैदानावर होता. पण दुर्दैवाने तो स्वयंचीत झाल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. बॅकफूटवर फटका मारताना त्याचा पाय यष्टय़ांना लागल्याने तो स्वयंचीत झाला.
इंग्लंडला मिळालेले आव्हान बरेच कठीण होते. चौथ्या डावात एवढय़ा मोठय़ा धावांचा आजपर्यंतच्या कसोटी इतिहासात एकाही संघाने यशस्वी पाठलाग केलेला नाही. 2003 मध्ये विंडीजने 418 धावांचा पाठलाग करीत स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाला सेंट जॉन्स कसोटीत हरविले होते. हाच आजवरचा सर्वोत्तम यशस्वी पाठलाग नोंदला गेला आहे. येथील कसोटीत इंग्लंडला स्पेशालिस्ट स्पिनर जॅक लीचची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्याऐवजी त्यांनी चार वेगवान गोलंदाजांना निवडले होते. तिसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने हाच संघ कायम ठेवला आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 9 बाद 473 डाव घोषित, इंग्लंड पहिला डाव 236, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 61 षटकांत 9 बाद 230 डाव घोषित, इंग्लंड दुसरा डाव 113.1 षटकांत सर्व बाद 192 ः बर्न्स 34, हमीद 0, मलान 20, रूट 24, स्टोक्स 12, पोप 4, बटलर 26, वोक्स 44 (97 चेंडूत 7 चौकार), रॉबिन्सन 8, ब्रॉड 9, अँडरसन 2, अवांतर 9. गोलंदाजी ः स्टार्क 2-43, रिचर्डसन 5-42, नेसर 1-28, लियॉन 2-55.