ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात एकीकडे लसीकरणाला वेग आला असतानाच महाराष्ट्र, केरळ, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि मध्यप्रदेशसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने देशातील रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे.
भारतात मागील 24 तासात 89 हजार 129 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 714 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 110 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 7 कोटी 30 लाख 54 हजार 295 लोकांना लस देण्यात आली आहे.
शुक्रवारी 44,202 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 69 हजार 241 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 6 लाख 58 हजार 909 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा वेगाने फैलावत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजनांचे काटेकोर पालन आणि कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.