नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होताना दिसत नाही. सध्या देशात दररोज 40 हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशव्यापी लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत लसीच्या 52.95 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 21 लाख 17 हजार 826 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 2 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 85 हजार 227 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.20 टक्के आहे.