नवे रुग्ण पुन्हा 20 हजारांवर : बरे होणाऱयांपेक्षा बाधित वाढले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने गुरुवारी महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. कोविडमुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने एक कोटीचा आकडा ओलांडला. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासात 19 हजार 587 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, गुरुवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 20 हजार 346 इतके नवे बाधित आढळले. गेल्या काही महिन्यात गुरुवारी प्रथमच डिस्चार्ज मिळणाऱया रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.
देशात गेल्या 24 तासात 222 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 67.57 टक्के मृत सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात बुधवारी एकाच दिवसात सर्वाधिक 66 मृत्यूची नोंद झाली. केरळमध्ये 25 तर पश्चिम बंगालमध्ये 22 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 3 लाख 95 हजार 278 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 1 लाख 50 हजार 336 मृत्यू झाले आहेत. तर, 1 कोटी 16 हजार 859 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून 96 टक्के झाला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 28 हजार 83 इतकी झाली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 51 टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांत केंद्रित आहेत. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे. केरळमध्ये काल एका दिवसात सर्वाधिक 5,110 रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 2,570 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन बाधित रुग्णांपैकी 83 टक्के रुग्ण 10 राज्यांमधील आहेत.