सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने इंडियन बॉईजचा 10 गडय़ानी तर दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबने साहिल पिरनवाडी संघाचा 10 धावानी पराभव केला. साहिल पारिशवाड (आनंद), वैभव कुरीबागी (दैवज्ञ) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंडियन बॉईजने 18.2 षटकात सर्व बाद 115 धावा केल्या. त्यात ओम चव्हाणने 42, प्रणव सोमण्णावरने 27 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे वाहिदने 14 धावात 3, आर्यन गवळीने 20 धावात 2 तर ओंकार देशपांडेने 36 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आनंद अकादमीने 15 षटकात बिनबाद 116 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिकला. त्यात साहिल पारिशवाडने 13 चौकारासह 70 तर किरण पुजारीने 40 धावा केल्या. दुसऱया सामन्यात दैवज्ञ स्पोर्ट्सने 20 षटकात 7 बाद 168 धावा केल्या. त्यात वैभव कुरीबागीने 2 षटकार, 7 चौकारासह 61, चेतन पागदने 26, संतोष नाईकने 17 धावा केल्या. शहापूर इलेव्हनतर्फे रमजानने 18 धावात 2 अलि मकानदारने 26 धावात 2, वासीमने 37 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल शहापूर संघाने 20 षटकात 6 बाद 158 धावाच केल्या. त्यात सागर नाईकने 42, संतोष कुलकर्णीने 35, वासीम मतवालेने 21 धावा केल्या. दैवज्ञतर्फे, रघु कुलगुकने 30 धावात 2 तर किसन बी.ने 23 धावात 2 गडी बाद केले.