नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत दोन कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या 15 ते 18 वयोगटातील 22 टक्के मुलांना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे. याशिवाय 2 कोटी 19 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी करता येते. मोहिमेच्या सुरुवातीपासूनच मुलांकडून लसीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने मोहिमेने वेग पकडला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 151 कोटी 50 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 86 लाखांहून अधिक डोस देण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभरात 90 लाख 59 हजार 360 लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशातील 91 टक्क्मयांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला किमान एक डोस तरी देण्यात आला आहे. तर 66 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.