वृत्तसंस्था/ ताश्कंद
सध्या भारतीय महिला फुटबॉल संघ ताश्कंदमध्ये आंतरराष्ट्रीय सरावाचे फुटबॉल सामने खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या दौऱयातील गुरुवारी झालेल्या दुसऱया सामन्यात बेलारुसने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यातील पूर्वार्धात दोन्ही संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. 66 व्या मिनिटाला बेलारुसचे खाते नेस्टासियाने पेनल्टीवर उघडले. 78 व्या मिनिटाला फिलिपिनेका हॅनाने बेलारुसचा दुसरा गोल केला. भारतातर्फे एकमेव गोल संगीताने नोंदविला. या सामन्यात भारताने गोल करण्याच्या अनेक सोप्या संधी दवडल्या. बेलारुसच्या बचावफळीचे तसेच गोलरक्षिकेची कामगिरी भक्कम झाल्याने भारताला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.