प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन दिवसांत बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनामुळे 36 जणांचा बळी गेला आहे, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. प्रशासनाने याची पुष्टी केली नसली तरी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पडलेला मृतदेहांचा खच पाहता ही माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
तरुण भारतला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर खासगी इस्पितळात 5 जण दगावले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांपैकी तिघे जण बेळगाव शहरातील आहेत. चव्हाट गल्ली, वैभवनगर, वीरभद्रनगर, गोकाक, अथणी, निपाणी येथील बाधितांचा व संशयितांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी कोविड-19 वॉर्डमध्ये दोघे जण तर जिरॅटिक वॉर्डमध्ये चौघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी बिम्स्चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही तर 219 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख आहे. मात्र बुधवारी बाधितांचा आकडा 76 इतका आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासूनचे प्रलंबित अहवाल समाविष्ट करून बुलेटिनमध्ये 219 चा आकडा जाहीर करण्यात आला आहे.
बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 76 पैकी 38 जण बेळगाव शहर व तालुक्मयातील आहेत. अनगोळ, आझमनगर, नेहरुनगर, काळी आमराई, वीरभद्रनगर, गांधीनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, भडकल गल्ली, बसवनकुडची, कॅम्प, वडगाव, टीचर्स कॉलनी, बागवान गल्ली, अशोकनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, सावगाव, मच्छे, नानावाडी व जेएनएमसी कॅम्पसमधील रहिवाशांचा समावेश आहे.
अथणी, चिकोडी, रायबाग, कागवाड, सौंदत्ती येथील अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांपैकी काही जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मृतांचा आकडाही वाढतो आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये चौघा जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख होता. यावरून प्रशासन मृतांचा आकडा लपवत आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सारीमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढती
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सारीमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढती आहे. खासगी इस्पितळात उपचार मिळत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी जागा मिळत नाही. या परिस्थितीने मृतांचा आकडा वाढतो आहे. गेल्या 48 तासांतील परिस्थिती लक्षात घेता मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अद्याप स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत, असे सांगून अधिकाऱयांनी यासंबंधी माहिती देण्याचे टाळले.
दोन पोलिसांना लागण
हिरेबागेवाडी व मार्केट पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी स्वॅब तपासणी अहवालात हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातील 41 वषीय पोलीस हवालदार व मार्केट पोलीस स्थानकातील 45 वषीय पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जिल्हय़ात हिरेबागेवाडी या एकाच गावात कोरोना रुग्ण संख्या मोठी होती. हे गाव कोरोनामुक्त झाले होते. आता पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मार्केट पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱया व रक्षक वाहनाचा चालक असणाऱया 45 वषीय पोलिसालाही कोरोनाची लागण झाली आहे. 15 जुलैपासून हे दोघे क्वारंटाईनमध्ये होते. कुटुंबीयांच्या औषध उपचारासाठी या दोघा जणांना वारंवार खासगी इस्पितळात जावे लागले होते. यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वस्तुस्थिती जाणा… नियम पाळा…
गेल्या 48 तासांत 36 जणांचा बळी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रशासनाकडून ही माहिती जाहीर केली जाते. मात्र वस्तुस्थिती काय आहे, हे बेळगावकरांसमोर मांडण्यासाठी ‘तरुण भारत’ने कोरोनाबाधित व कोरोना बळींविषयी सरकारी आकडेवारी वेगळी असताना खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे कोणाला घाबरविण्यासाठी नाही तर वस्तुस्थिती काय आहे? याची माहिती करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. नागरिकांनी स्वतःच सर्व नियमांचे पालन करून कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करतानाच इतरांचीही काळजी घेण्याची गरज आहे. सरकारने पूर्ण प्रमाणात लॉकडाऊन खुले केलेले असताना स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
एका रुग्णवाहिकेत अनेक जण
सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्जिकल ब्लॉकमधून कोविड-19 वॉर्डला रुग्णाला हलविताना सामाजिक अंतराचा फज्जा उडविण्यात आला होता. बुधवारी सकाळी एका रुग्णवाहिकेत दहाहून अधिक जणांना कोंडल्याचे निदर्शनास आले. कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच सामाजिक अंतर व इतर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
1780 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील आणखी 1780 जणांचा अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 461 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 830 हून अधिक जणांवर उपचार करण्यात येत आहेत. आणखी 6 हजार 380 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.