साईराज चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
साईराज स्पोर्टस् क्लब आयोजित साईराज चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्टस् एस. जे., धड सकळ गोवा, पांडुरंग सीसी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गुरुप्रसाद, आरिफ शेख, इलू बेंगळोर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित साईराज चषक स्पर्धेच्या आज सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात धड सकळ गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 93 धावा केल्या. त्यात गुरुप्रसादने 4 षटकारासह 36, सूर्या जी. ने 2 षटकारासह 26 धावा केल्या. एवायएम अनगोळतर्फे लखन गावडे व संतोष नलवडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम बी. अनगोळ संघाचा डाव 10 षटकात सर्व गडी बाद 55 धावात आटोपला. त्यात सुरज गोडेकरने 15 तर धीरज कोलीने 13 धावा केल्या. गोवातर्फे गौरेश एन. ने 10 धावात 4 तर सूर्या गोकरने 10 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात साईराज वारियर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 9 गडी बाद 59 धावा केल्या. त्यात मदन बेळगावकरने 14 तर सादीक तिगडीने 12 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे आरिफ शेखने 16 धावात 3 तर तुषार आर. 10 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पांडुरंग सीसीने 9.1 षटकात 7 गडी बाद 60 धावा करून सामना तीन गड्यांनी जिंकला. त्यात बबलू पाटीलने 15 तर सचिन बोरजेने 12 धावा केल्या. साईराजतर्फे रब्बानी दफेदारने 15 धावात 4 गडी बाद केले.
तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मराठा स्पोर्टर्स एसजे संघाने प्रथम फलंदाजी करताना 9.5 षटकात सर्व गडी बाद 60 धावा केल्या. त्यात अर्जुन भोसलेने 25 धावांचे योगदान दिले. एवायएमतर्फे दीपकने 14 धावात 4, राहुल जे. व केतन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम अनगोळ अ संघाचा डाव 9.1 षटकात 31 धावा आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मराठा स्पोर्टस्तर्फे इलू बेंगलोरने 4 धावात 4 तर अफझलने 6 धावात 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण पाटील, रोहित फगरे, महेश फगरे, विनोद केरुर, दिलीप पवार, अरुण पवार, संजय कडोलकर, किरण जाधव, देवरथ जगजंपी, सचिन सबनीस, युवराज जाधव, वेंकटेश सरनोबत आदी मान्यवरांच्या हस्ते गुरुप्रसाद, आरिफ शेख, इलू बेंगलोर यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
टेनिस बॉल जगतातील दिग्गज खेळाडू आज बेळगावात
बेळगाव येथे साईराज चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत. यावेळी बेळगावकरांना टेनिस बॉल जगतातील महान क्रिकेटपटू इजाज कुरेशी, कृष्णा सातपुते, आकाश तरेकर, योगेश पेंडकर, अजित मोहिते, नितीन माटुंगे, शुभम मोरे, पंकज पटेल, राजेश चोरटे, मयुर वाघमारे, अभिजित दुधे, पंकज जाधव उर्फ माट्या, अफझल मगदूम, महाराज यांचा आक्रमक खेळ व भेदक गोलंदाजी व आकर्षक फटकेबाजी पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे बेळगावातील क्रिकेट शौकिन या खेळाडूंच्या खेळाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
गुरुवारचे सामने- चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना प्रथमेश मोरे स्पोर्टस् वि. एफएम होस्पेट यांच्यात सामना होणार आहे.