वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांतने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
धनुषने 24 शॉट्सच्या अंतिम फेरीत 249.4 गुण मिळवित सुवर्ण पटकावले. स्वीडनच्या पाँटस कॅलिनने त्याच्यापेक्षा 1.3 गुण कमी घेत रौप्य व फ्रान्सच्या रोमोन ऑफ्रिरने कांस्य मिळविले. याशिवाय भारताने सांघिक स्कीट प्रकारातही कांस्यपदक मिळविले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत हरमेहर लाली व संजना सूद यांनी स्वीडनच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पदकतक्त्यात भारताने 3 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदकांसह अग्रस्थान मिळविले असून दुसऱ्या स्थानावरील अमेरिकेने 2 सुवर्ण, एक रौप्य मिळविले आहे.