प्रतिनिधी/ बेळगाव
राज्याचे नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. बेळगाव दौऱयावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जय्यत तयार चालविली असून महापालिका कार्यालयात थुंकून घाण करण्यात आलेल्या भिंतींना रंगरंगोटी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नगरविकास मंत्र्यांचे जंगी स्वागत होणार असल्याचे दिसून आले आहे.
महापालिका सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे होत आली. पण अद्याप निवडणुका झाल्या नाहीत. मात्र, महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणारी विविध विकासकामे आणि स्मार्ट सिटी योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. बेळगाव दौऱयावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. विकासकामांची पाहणी करणार असल्याने त्या ठिकाणांची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दिवसभर स्वच्छता आणि मनपाच्यावतीने राबविण्यात येणाऱया विकासकामांची माहिती तयार करण्यात सर्व अधिकारी गुंतले होते.
नेहरूनगर येथील खुल्या जागेत महापालिकेच्यावतीने व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. त्यामुळे या कामाची पाहणी नगरविकास मंत्री करणार असल्याने या ठिकाणी पसरलेली माती तसेच स्वच्छता करण्याचे काम गुरुवारी सुरू होते. त्याचप्रमाणे महापालिका कार्यालयात शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी विकास आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयाची स्वच्छता करण्याबरोबरच थुंकून रंगविलेल्या भिंतींची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू होते. नगरविकास मंत्री येणार असल्याने जणू सण असल्याप्रमाणे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू होते. त्याप्रमाणे विकासकामांची माहिती जमा करून आवश्यक तो अहवाल तयार करण्यात मनपाचे अधिकारी व्यस्त होते.
शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 35 टिप्पर खरेदी केले आहेत. सदर कचरावाहू वाहनांचा वापर प्रत्येक वॉर्डमधील कचऱयाची उचल करण्यासाठी करण्यात येणार आहे. सदर वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया मनपाने पूर्ण केली आहे. त्यामुळे सदर वाहनांचे पूजन नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. यांच्या हस्ते करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे कचरावाहू वाहनांना नगरविकास मंत्री हिरवा झेंडा दाखविणार आहेत.