वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हने स्पेनच्या टॉप सीडेड राफेल नदालला उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी व्हेरेव्ह आणि रशियाचा मेदव्हेदेव यांच्यात लढत होईल.
या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात व्हेरेव्हने नदालचा 6-4, 7-5 अशा सेट्सच्या पराभव करत पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता तो या स्पर्धेत पहिल्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2007 साली नदालने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती पण त्याला अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र व्हेरेव्हने आतापर्यंत चारवेळा मास्टर्स स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळविली आहेत. दुसऱया उपांत्य सामन्यात रशियाच्या तृतीय मानांकित मेदव्हेदेवने कॅनडाच्या मिलोस रेओनिकचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.