लेप्टो, डेंग्यू आदी चाचण्या येतात निगेटिव्ह, मात्र नवीन लक्षणांमुळे रुग्ण हैराण : आरोग्य विभागाकडून सर्व्हे, जनजागृती हवी
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनेक भागात सध्या एका नवीन प्रकारातील तापसरीच्या साथीने बऱयापैकी दहशत माजविली आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, कफ, चेहऱयाला सूज, चक्कर, एखाद्या अवयवाची हालचाल कमी होणे, न्युमोनियापर्यंतची लक्षणे काही वेळा उलटी, संडास अशीही लक्षणे दिसणाऱया या तापसरीबाबत लेप्टो, डेंग्यू, मलेरियाच नव्हे तर कोविड टेस्टही निगेटिव्ह येतात. मात्र, रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत आहेत. नियमित उपचार पद्धतीला रुग्ण प्रतिसाद देत असले तरीही उपचाराला उशीर झाल्यास धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाकडून अशाप्रकारच्या तापसरीबाबत सर्व्हे होऊन उपचाराबाबत तातडीने जनजागृती करण्याची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये लेप्टो स्पायरोसीस या तापसरीने अनेकांना प्राण गमवावे लागले. साधारणत: 1998-99 च्या सुमारास ही तापसरी लेप्टोची असल्याबाबत तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱयांनी लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्याबाबत अनेक शंका काढत हा प्रकार लेप्टोचा नसल्याचा युक्तीवाद करण्यावर भर दिला. पुढे काहीवर्षे जिल्हय़ातील अनेकांना या लेप्टोमुळे प्राणाला मुकावे लागले. मात्र, त्यानंतर हा लेप्टोच असल्याबाबत अनेक संशोधने होत, जनजागृतीवरही भर देण्यात आला. ताप आल्यास रुग्णांनी तातडीने उपचार करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. डॉक्सीसायक्लिनच्या गोळय़ा वाटप करण्यात आल्या. परिणामी, अलिकडच्या काळात या लेप्टोवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्गच्या अनेक भागात विशेषत: कणकवली तालुक्यातील बऱयापैकी ग्रामीण भागात एकाच प्रकारच्या लक्षणांचे रुग्ण आढळत आहेत. यात सुरूवातीला अंगदुखी होऊन ताप, सर्दी होते. रुग्णाला कफ होतो. काहींना चेहऱयाला, काहींना मेंदूलाही सूज येते. तर काही रुग्णांना न्युमोनिया होत असल्याचे दिसते. या साऱयात रुग्णाला कमालीचा अशक्तपणा येतो. हात-पाय पूर्णत: मोडल्यासारखी स्थिती होते. मात्र, यातील काही लक्षणे हे कोविडसदृश असल्याने रुग्ण घाबरतात. ते टेस्ट करण्यासही जात नाहीत. मात्र, यात प्रॉपर उपचार न मिळाल्यास किंवा थोडे बरे वाटून शेतीमध्ये काम केल्यास पुन्हा त्रास जाणवतो.
यात रुग्णाच्या लेप्टो, डेंग्यू, मलेरिया किंबहुना कोविड टेस्ट केल्या तरीही त्या निगेटिव्ह येतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले. मात्र, या व्हायरसची बहुतांशी लक्षणे ही लेप्टो, डेंग्यू, मलेरिया, कोविड यासारखीच आहेत. परिणामी, या टेस्ट निगेटिव्ह आल्या तरीही त्यासाठी या साऱयाकरीता वापरण्यात येणारी नियमित उपचार पद्धती फायदेशीर ठरताना दिसत आहे. या उपचारपद्धतीने रुग्ण बरा होताना दिसतो. मात्र, लागण झाल्यापासून सुमारे 10 ते 15 दिवस या व्हायरसचा प्रभाव राहत असून या कालावधीत रुग्णांना बऱयापैकी अशक्तपणा जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेले काही दिवस अशाप्रकारच्या व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. हा व्हायरस नेमका कोणता? याचा शोध घेण्याची गरज आहे. या तापसरीची काही लक्षणे ही ‘एनसेफेलिटीस’ व्हायरससारखी आहेत. लागण झाल्यानंतर काही लक्षणे कोविडसदृश्य असल्याने रुग्ण उपचारासाठी जाण्यासही सुरूवातीला घाबरत असल्याचे दिसते. याबाबत आरोग्य विभागाने सर्व्हे करून लोकांना उपचारासाठी वेळेत दाखल होण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे. यापूर्वी लेप्टोबाबत सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाने बऱयापैकी जनजागृती करून लोकांना वेळेत उपचारासाठी दाखल होण्यास प्रोत्साहित केले. आजार होऊ नये यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत जागृती करण्यात आली. डॉक्सीसायक्लिनच्या गोळय़ांचे वाटप करण्यात आले. परिणामी, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. त्याचप्रमाणे या तपासरीबाबत सर्व्हे होऊन उपायोजनाच्यादृष्टीने जागृतीची गरज आहे. हा व्हायरस बऱयापैकी संसर्गजन्य असल्याचे दिसून येत असल्याने त्याबाबतही जागृतीची गरज आहे.