ऑनलाईन टीम / जेरुसलम :
इस्रायलमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नसल्याच्या आरोप पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर करण्यात आला आहे. सरकारच्या धोरणांवर नाराज असलेले तेथील युवक मागील तीन दिवसांपासून नेतान्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत. अखेर आज निदर्शकांनी नेतान्याहू यांच्या घराचे रस्ते रोखले.
इस्रायलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. कोरोना संकटाचे गांभीर्य नसलेल्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची मागणी निदर्शकांनी केली आहे. निदर्शकांमध्ये युवकांची मोठी संख्या आहे.
सुरुवातीला या देशाने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे पंतप्रधानांचे कौतुक होत होते. रुग्ण कमी येत असल्याने अनेक हॉस्पिटल बंद करावे लागले होते. मे मध्ये नेतान्याहू यांनी कोरोनावर मात केल्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने युवक आक्रमक झाले आहेत.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इस्रायल जगात 37 व्या क्रमांकावर आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 59 हजार 475 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 448 जणांचा मृत्यू झाला आहे.