पालिका सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गेंधळ : एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार : गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी
प्रतिनिधी /निपाणी
निपाणी नगरपालिकेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. नगरपालिकेच्या मालकीच्या म्युन्सिपल हायस्कूलचे हस्तांतरण करण्याच्या विषयावरून सभेत मोठा गदारोळ माजला. याचवेळी सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या अंगावर गेल्याने सभेला गालबोट लागले. धक्काबुक्की, एकमेकांना अर्वाच्च्य भाषा, बघून घेण्याची धमकी यामुळे सभागृहाची प्रथा, परंपरा धुळीस मिळाल्याचे दिसून आले. सभेदरम्यान वारंवार नितीमूल्यांचा अवमान होत असल्याने नगरसेवकांच्या या वागणुकीमुळे शहरवासियांत संतापाची लाट उसळली आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. प्रारंभी कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्ती, समाजसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी स्वागत केले. यावेळी प्रभाग क्र. 31 च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका सुनीता गाडीवड्डर यांचा सत्कार सभागृहातर्फे करण्यात आला. यानंतर 26 फेबुवारीच्या सर्वसाधारण सभेतील ठरावांना मंजुरी देण्याचा विषय मांडताच विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी एलईडी दिव्यांना परवानगी नसताना देवचंद महाविद्यालय ते समाधी मठापर्यंत एलईडी दिवे बसवले कसे? असा सवाल केला. याचवेळी नगरसेवक संतोष सांगावकर यांनी संभाजीराजे चौक ते कोल्हापूर नाकापर्यंत पथदीपांवरील एलईडी दिवे गाडीवड्डर यांनी काढून प्रभाग 24 व 31 मध्ये बसवल्याचा आरोप करताच जोरदार वादावादी सुरू झाली.
यानंतर 25 पैकी पहिले 10 ठराव या गोंधळात मंजूर करून घेण्यात आले. यादरम्यान विरोधी नगरसेवकांनी चर्चेसाठी बोलण्याची परवानगी मागितली. मात्र 1 मिनिटापेक्षा अधिक परवानगी देता येणार नसल्याचे नगराध्यक्ष जयवंत भाटले व सभापती सद्दाम नगारजी यांनी सांगितल्याने वाद आणखी वाढला. याचवेळी म्युन्सिपल हायस्कूल सरकारला हस्तांतरीत करण्याबाबतचा ठराव मांडताच विलास गाडीवड्डर, संजय सांगावकर, शेरु बडेघर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्ष भाटले यांच्यासमोर जात या ठरावाला तीव्र विरोध दर्शविला. याचदरम्यान सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकमेकांना भिडले. यावेळी एकेरी भाषा, जोरदार वादावादी व अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाल्यामुळे सीपीआय संगमेश शिवयोगी, पीएसआय अनिलकुमार कुंभार यांनी मध्यस्थी करत वाद शमवण्याचा प्रयत्न केला.
विलास गाडीवड्डर यांनी नगराध्यक्षांच्या अंगावर धावून जात अपमान केल्याने त्यांनी माफी मागण्याची मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली. यावर बोलताना गाडीवड्डर यांनी सभेत बोलण्याची संधीच न दिल्याने याचा जाब विचारण्यासाठी नगराध्यक्षासंमोर आपण गेल्याने माफी मागण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. यावेळी सुरू असलेल्या गोंधळातच विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांचे ठराव मंजूर असल्याची घोषणा सत्ताधारी गटाने केली. त्यानंतर याविरोधात आपण तक्रार करणार असल्याचे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान, सभेत सुरू असलेल्या वादावादीवेळी आयुक्तांसह सर्वच अधिकाऱयांनी बघ्याची भूमिका घेणे पसंत केले. दरम्यान, नगरसेवकांच्या या कृतीमुळे शहरवासियांनी संताप व्यक्त केला.