शिरोळ / प्रतिनिधी
खडकेवाडा कागल येथील मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज पहाटे घडली. मुरगूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी याप्रकरणी प्रत्यक्ष भेट देऊन तपास सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खडकेवाडा ता. कागल येथील निपाणी–मुरगुड या मुख्य मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे वसंत पाटील यांच्या इमारतीमध्ये एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या दरम्यान एटीएमचे पुढील भाग तोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, रक्कम हाती लागली नाही. सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. ही घटना प्रथमच या ग्रामीण भागात घडल्याने एकच खळबळ माजली आहे.