ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांना फटकारले : शिक्षेस विलंब होत असल्याने नाराजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘निर्भयाच्या आईने सोनिया गांधी यांचे अनुकरण करत दोषींना माफ करावे,’ असा अजब आणि संतापजनक सल्ला देणाऱया ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांना निर्भयाच्या आई-वडिलांनी शनिवारी कठोर शब्दात फटकारले. ‘तुमच्यासारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. अशा नराधमांना साथ देऊन तुम्ही पैसे मिळवता’ असे निर्भयाच्या आई म्हणाल्या. तर वडिलांनी ‘आम्ही सोनिया गांधींएवढे सहृदयी नाही’ असे सांगत ‘तुम्हाला असे सुचवताना लाज कशी वाटली नाही?’ अशी विचारणाही केली.
इंदिरा जयसिंग यांच्या या वक्तव्याचे वाभाडे निर्भयाच्या माता-पित्यांनी काढले आहेत. आधीच फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यास विलंब लागत असल्याने आम्ही नाराज असून इंदिरा जयसिंग यांनी डागण्या दिल्या आहेत, असे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर हेच लोक महिला सुरक्षेच्या विषयावरुन घोषणाबाजी करत रॅली काढत होते. परंतु आता राजकीय फायदा उठवण्यासाठी मानवतेचे ढोंग करत आहेत. दोषींना माफ करण्याचा सल्ला देणाऱया इंदिरा जयसिंग आहेत कोण, त्यांची असा सल्ला देण्याची हिम्मत होतेच कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण देश नराधमांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी करत आहे. पण यांच्यासारख्या लोकांमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. घटनेनंतर गेल्या काही वर्षात सर्वोच्च न्यायालयात इंदिरा जयसिंग यांच्याशी माझी अनेकदा भेट झाली असताना त्यांनी माझी कधीही चौकशी केली नाही. मात्र आता दोषींची बाजू घेऊन मला सल्ला देत आहेत. बलात्कार करणाऱया नराधमांची साथ देऊनच अशा लोकांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळेच बलात्कार आणि हत्यांच्या घटना थांबत नसल्याचेही आशादेवी म्हणाल्या.
आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींपैकी पवन गुप्ता याने अल्पवयीन असल्याचा दावा करत न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवार, 20 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी होईल.