वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये आता पुन्हा संसदेतील कनिष्ठ सभागृहासाठी मतदान होणार आहे. या मध्यावधी निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणर आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 12 नोव्हेंबर तर दुसऱया टप्प्यात 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधान पदासाठी शेर बहादुर देउबा आणि के.पी. शर्मा ओली या दोघांचेही दावे फेटाळले होते. नेपाळमध्ये संसद विसर्जित करण्याचा निर्णय घटनेतील कलम 76 (7) अंतर्गत घेण्यात आला आहे.
नेपाळमधील विरोधी पक्षंनी राष्ट्रपतींना 149 खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवत सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची तयारी होती. याचदरम्यान ओली यांनीही अचानक राष्ट्रपतींची भेट घेत 153 खासदारांचा पाठिंबा प्राप्त असल्याचा दावा केला होता.