लष्करप्रमुख नरवणे यांची माहिती : उत्तराखंडमध्ये पासिंग आऊट परेड कार्यक्रमात कॅडेट्सना मार्गदर्शन
डेहराडून / वृत्तसंस्था
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नेपाळसोबत भारताचे सलोखापूर्ण संबंध कायम आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता लष्करी कमांडर पातळीवर सुरू झालेल्या चर्चेनंतर लडाखमधील तणावाचे वातावरण निवळत असल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शनिवारी उत्तराखंडमध्ये दिली. डेहराडून येथील सैन्य अकादमीमध्ये आयोजित पासिंग आऊट परेडनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत. चीनसोबत कमांडर स्तरावरील बैठकीचे सत्र सुरू आहे, या बैठकीतील चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चा सुरू आहेत. त्याद्वारे लडाखमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नरवणे यांनी येथे स्पष्ट केले. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून केंद्र सरकारवरही टीका करण्यात येत होती. तसेच अनेकांनी याबाबत चिंताही व्यक्त केली जात असल्यामुळे लष्करप्रमुखांनी त्याबाबत खुलासा केला.
नेपाळशी भारताचे उत्तम संबंध
नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी यावेळी सकारात्मकरित्या भाष्य केले. आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे परेडवेळी पाळले विशेष प्रोटोकॉल
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पासिंग आऊट परेडमध्ये सर्वांनी काही प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले. छात्रांनी मास्क परिधान करून परेड केली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून छात्रांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. दरम्यान, या परेडचे युटय़ूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी नरवणे यांनी छात्रांच्या कुटुंबीयांना संबोधित केले. ‘आजवर ही तुमची मुले होती आता ती आमची झाली आहेत’, असे ते यावेळी म्हणाले.
90 विदेशी छात्रांसह 333 जणांचे प्रशिक्षण पूर्ण
भारताच्या 333 छात्रांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये 90 विदेशी छात्रांचा सहभाग होता. सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्व छात्र आयएमएच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर परेड सुरू झाली. सर्वप्रथम डेप्युटी कमांडंटनी परेडला सलामी दिली. त्यानंतर कमांडर लेफ्टनंट जनरल जयविर सिंह नेगी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी परेडचे निरीक्षण केले.