सुरक्षा दलांची कामगिरी, आयईडी उपकरण नष्ट
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा पुलाखाली लावण्यात आलेले आयईडी स्फोटके निष्किय करुन सुरक्षा दलांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. दहशतवाद्यांनी बांदीपोरा पुलाखाली आयईडी स्फोटके लावून वाहनांचा ताफा उडवण्याचा कट केला होता.मात्र वेळीच खबर लागल्याने बॉम्ब नाशक पथकाच्या मदतीने हा कट निष्फळ करण्यात यश आले आहे.
दरम्यान, कुलगाममधील निपोरा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या तेरा दिवसांमधे तब्बल 25 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले असून त्यांना मदत करणाऱया सुमारे 159 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिली.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या रस्ते सुरक्षा अभियान पथकाला शनिवारी सकाळी श्रीनगर बांदीपोरा मार्गावर एका पुलाखाली शक्तीशाली आयईडी स्फोटके लावण्यात आल्याची खबर मिळाली. त्यानंतर या मार्गावरील रहदारी तातडीने बंद करण्यात आली. सेनेने संपूर्ण परिसर सील केल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने मोठय़ा धाडसाने आणि सावधानतेने ही स्फोटके निष्क्रिय केली आहे. इरिन नदीवरील पुलाखाली हे बॉम्ब लावण्यात आले होते.
कर्नल कालिया यांनी सांगितले, वेळेत आयईडी निष्क्रिय झाले नसते तर या मार्गावरुन जाणाऱया लष्करी व नागरी वाहनांना धोका निर्माण झाला असता. तसेच जिवीत व वित्त हानी होण्याबरोबरच हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन पुढील संपर्क तुटला असता. या अभियानानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईजही करण्यात आला आहे.
कुलगाममध्ये दोन दहशतवादी ठार
दरम्यान, कुलगाम जिल्हय़ातील निपोरा भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. शनिवारी पहाटे उडालेल्या चकमकीनंतर जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ दोन पिस्टल, तीन ग्रेनेड आढळून आली.या परिसरात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध अभियान सुरु केले होते. तथापि दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सेनादलांनी त्यांचा खात्मा केला. दुसरीकडे शोपिया परिसरातही शोध अभियान आणि चकमक सुरु असल्याचेही सेना दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाच्यावतीने सांगण्यात आले.
13 दिवसांत 25 दहशतवादी ठार
तर गेल्या 13 दिवसांमाध्ये 25 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. 1 जून घुसखोरी करणाऱया 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले तर 2 रोजी त्राल इलाक्यात 2, 3 रोजी पुलवामा कंगन भागात 3, जून 5 रोजी राजौरीतील कालाकोट भागात 1, 8 जून रोजी पिंजोरा इलाक्यात 4 तर 10 जूनला शोपियातील सुगु भागात 5, जून 13 रोजी कुलगाममधील निपोरा भागात 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. तर काश्मीर भागात एलओसीवर 150 ते 250 आणि जम्मू इलाक्यात सीमारेषेनजिक 125 ते 150 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज आहे.