वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडचा फलंदाज देवॉन कॉनवेने कसोटी क्रिकेटमध्ये आगळा विक्रम केला आहे. कसोटीत पदार्पण केल्यानंतर कॉनवेने आपल्या पहिल्या पाच सामन्यातील पहिल्या डावात 50 पेक्षा अधिक धावा नोंदविल्या आहेत. असा पराक्रम करणारा कॉनवे हा पहिला फलंदाज आहे.
कॉनवेने 2021 च्या जूनमध्ये लॉर्डस् मैदानावर इंग्लंडविरूद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. सध्या बांगलादेशविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱया कसोटीत कॉनवेने कर्णधार लॅथमसमवेत अभेद्य 201 धावांची भागिदारी करताना तो 99 धावांवर खेळत आहे. इंग्लंडमधील झालेल्या एजबेस्टनच्या कसोटी सामन्यात कॉनवेने पहिल्या डावात 80 धावा झळकविल्या होत्या. त्यानंतर त्याने आपल्या तिसऱया कसोटी सामन्यात भारताविरूद्ध पहिल्या डावात 54 तर बांगलादेश बरोबरच्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 122 धावा झळकविल्या होत्या.