पत्नी भारतीय – पर्यटन व्हिसाचा गैरवापर केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यूझीलंडचा प्रसिद्ध ब्लॉगर कार्ल रॉकच्या भारतातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी कार्लवर व्हिसा नियमांच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. कारवाईनंतर कार्लने सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
भारतातून 2020 मध्ये दुबई आणि पाकिस्तानचा प्रवास केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने व्हिसा रद्द केला आहे. दुबईतून नव्या व्हिसाकरता अर्ज केले असता काळय़ा यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे कळविण्यात आल्याचे कार्लने सांगितले आहे. कार्लने हरियाणातील मनीषा मलिक नावाच्या महिलेसोबत विवाह केला आहे.
एक वर्षासाठी बंद
कार्ल पर्यटन व्हिसावर भारतात आला होता आणि येथे व्यवसाय करत होता. अनेकदा त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे. याचमुळे व्हिसा रद्द करत त्याला एक वर्षासाठी भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली जात असल्याचे अधिकाऱयांकडून वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे.
पत्नीपासून दूर करण्याचा आरोप
कार्लने भारत सरकारवर स्वतःच्या पत्नीपासून वेगळे करण्याचा आरोप केला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मुत्सद्दी तसेच पत्रकारांना मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे. कार्लकरता सोशल मीडियावर एक स्वाक्षरी मोहीमही चालविली जात आहे. काळय़ा यादीत समाविष्ट झाल्यावर कार्लने युटय़ूबवर व्हिडिओ पोस्ट करत पत्नीला 269 दिवसांपासून भेटलो नसल्याचे म्हटले आहे.
भारतभ्रमंतीचा दावा
कार्ल रॉकचे युटय़ूबवर 18 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात फिरलो असल्याचा त्याचा दावा आहे. विदेशी पर्यटकांच्या होणाऱया फसवणुकीचा व्हिडिओ तयार करून त्याचा खुलासा कार्लकडून केला जात होता.