भारताविरुद्ध पहिली टी-20 – नॅट स्कीव्हरचे विक्रमी अर्धशतक ठरले निर्णायक
नॉर्थम्प्टन / वृत्तसंस्था
अष्टपैलू नॅट स्कीव्हरने विक्रमाशी बरोबरी साधणारे अर्धशतक झळकावल्यानंतर या बळावर इंग्लिश महिला संघाने भारतीय महिला संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 18 धावांनी विजय संपादन केला. पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमाचा अवलंब केला गेला. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 177 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताने 8.4 षटकात 3 बाद 54 धावा केल्या, त्यावेळी पावसाचा व्यत्यय आला आणि पुढे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.
इंग्लंडच्या डावात स्कीव्हरने 27 चेंडूत 55 धावांची आतषबाजी केली. यात 8 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. यष्टीरक्षक-फलंदाज ऍमी जोन्सने 27 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. इंग्लंड महिला संघाने या विजयासह मालिकेत 1-0 अशा आघाडी घेतली आहे.
विजयासाठी 178 धावांचे आव्हान असताना पेसर कॅथरिन ब्रन्टने शफाली वर्माला शून्यावर बाद केले, तो भारतासाठी मोठा धक्का ठरला. स्मृती मानधना (17 चेंडूत 29) व हरलीन देओल (नाबाद 17) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी 44 धावांची भागीदारी साकारली. मानधनाने 6 चौकार फटकावले. मात्र, स्कीव्हरने धोकादायक ठरु पाहणाऱया मानधनाला सहाव्या षटकात बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरचा खराब फॉर्म येथे देखील कायम राहिला. तिला अष्टपैलू साराह ग्लेनने अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी, अनुभवी जलद गोलंदाज शिखा पांडेने (3-22) तिखट मारा साकारत 3 बळी घेतले तर फिरकीपटू पूनम यादव व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लिश सलामीवीर टॅमी ब्युमाऊंट व डॅनी वॅट यांनी पॉवर प्लेच्या 6 षटकात 48 धावांचे योगदान दिले होते.
संक्षिप्त धावफलक
इंग्लिश महिला संघ ः 20 षटकात 7 बाद 177 (नॅट स्कीव्हर 27 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 55, ऍमी जोन्स 27 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 43, डॅनी वॅट 28 चेंडूत 3 चौकारांसह 31. शिखा पांडे 4 षटकात 3-22).
भारतीय महिला संघ ः 8.4 षटकात 3 बाद 54 (स्मृती मानधना 17 चेंडूत 6 चौकारांसह 29, हरलीन देओल 24 चेंडूत नाबाद 17, दीप्ती शर्मा नाबाद 4. कॅथरिन ब्रन्ट, स्कीव्हर, साराह ग्लेन प्रत्येकी 1 बळी).
हरलीन देओलचा सनसनाटी झेल व्हायरल! भारतीय महिला संघाला या लढतीत पराभव पत्करावा लागला असला तरी क्षेत्ररक्षक हरलीन देओलने सीमारेषेनजीक ऍमी जोन्सचा घेतलेला नाटय़मय झेल खळबळ उडवून गेला. जोन्सने वाईड लाँगऑफच्या दिशेने उत्तूंग फटका लगावल्यानंतर हरलीनने अचूक झेल टिपला. मात्र, तोल सावरता येणार नाही, सीमारेषेबाहेर आपण जाऊ, याचा अंदाज येताच तिने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सावरुन मैदानात डाईव्ह मारत अप्रतिम झेल पूर्ण केला. अगदी इंग्लिश खेळाडूंनी देखील टाळय़ा वाजवत याला दाद दिली. तिच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.