केजरीवाल खलिस्तान समर्थक असल्याचा कुमार विश्वास यांचा आरोप
पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी पंजाबमधील राजकारण तापले आहे. याचदरम्यान आम आदमी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आण कवि कुमार विश्वास यांनी आप प्रमुख अरविंद केजरीवालांवर मोठा आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये फुटिरवाद्यांचे समर्थक होते. आपण एक तर पंजाबचे मुख्यमंत्री होऊ किंवा एका स्वतंत्र देशाचे (खलिस्तान) पहिले पंतप्रधान होईन असे केजरीवालांनी सांगितले होते असा दावा विश्वास यांनी केला आहे.
पंजाब केवळ राज्य नसून एक भावना आहे हे केजरीवालांनी समजून घ्यावे. फुटिरवादी आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित लोकांना सोबत घेऊ नका असे त्यांना बजावले होते. फुटिरवादाला जगभरातून वित्तपुरवठा केला जातोय असे सांगितल्यावर केजरीवालांनी तर काय झाले, स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन असे उत्तर दिल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केजरीवालांवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. पंजाबला स्थिर सरकार हवे आहे. एका दहशतवाद्याच्या घरात तुम्हाला काँग्रेसचा नेता मिळणार नाही. परंतू झाडूचे सर्वात मोठे नेते (अरविंद केजरीवाल) तेथे दिसून येतील. पंजाबसमोर धोका असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.
2012 मध्ये भ्रष्टाचार विरोधात सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान कवि कुमार विश्वास आणि केजरीवाल हे एकत्र काम करत होते. आंदोलन संपल्यावर आम आदमी पक्षाची स्थापना झाली तेव्हा कुमार विश्वास देखील संस्थापक सदस्यांपैकी एक होते. परंतु दिल्लीत सरकार आल्यावर विश्वास आणि केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झाले हेते. काही काळानंतर विश्वास यांनी आम आदमी पक्षापासून अंतर राखले होते.