नवज्योत सिद्धूंची पक्षश्रेष्ठींशी भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्रीपदी राहतील आणि सिद्धूंना काँगेसचे प्रदेश अध्यक्षपद दिले जाईल, असा तोगडा पक्षश्रेष्ठींनी सुचविला असूनही पंजाब काँग्रेसमधील कलह सुरूच आहे. सिद्धू यांनी शुक्रवारी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाचे पंजाब प्रभारी हरीष रावत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मात्र, अंतिम तोडगा अद्यापही निघू शकलेला नाही.
बैठकीनंतर रावत यांनी पत्रकारांना माहिती दिली. पंजाब प्रदेश काँगेस अध्यक्षपदाविषयी अद्याप सोनिया गांधी यांनी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. तो घेतल्यानंतर त्याची माहिती देण्यात येईल. आपण पंजाबमधील काँगेसच्या परिस्थितीचा अहवाल पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना दिला आहे. त्यावर नंतर विचार केला जाईल. राज्यातील काँगेसमधील पेच सोडविण्यात पक्षाला यश येईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
वाटेल तसा अर्थ लावतात
कोणत्याही वृत्ताचा आपल्याला हवा तसा अर्थ पत्रकारांकडून लावला जातो. पण काँगेस त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. आम्ही निर्णय घेतल्यानंतरच त्याची माहिती देतो. तोपर्यंत सर्वांनी धीर धरावा, असेही रावत यांनी सांगितले.
सिद्धू अबोलच
काँगेसचे प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळेल या अपेक्षेने सिद्धू सोनिया गांधींना भेटावयास आले होते. तथापि, भेटीनंतर पत्रकारांशी काहीही न बोलता ते निघून गेले. याचेही वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सिद्धू यांच्या पदरात फारसे काही पडले नसावे, असाही एक अर्थ लावला जात आहे. तर दुसऱया बाजूला, त्यांनी हेपुपुरस्सर मौन पाळले असून सोनिया गांधींनी त्यांचे समाधान केले आहे, असेही बोलले जात आहे. एकंदर, गोंधळाचे वातावरण कायम आहे.
अमरिंदरसिंग यांच्या बैठका
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही बैठकांची माळच लावली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये त्यांनी आपल्या समर्थक आमदारांशी ‘विश्वास बैठका’ सुरू केल्या आहेत. काही मंत्र्यांशींही त्यांनी चर्चा केली. सिद्धू यांची पक्षाध्यक्षपदी निवड होणे त्यांना मान्य आहे की नाही, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.