प्रतिनिधी / कणकवली:
एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत कोविड 19 टेस्टिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल येथे होणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री विजय गिरकर, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, निरंजन डावखरे, रमेश पाटील तसेच संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या प्रयोग शाळेचा चाचणी अहवाल 100 टक्के अचूक असून खात्रीशीर असणार आहे. अहवाल 24 तासांत मिळणार आहे. शासकीय नोकरदारवर्गाला त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तसेच उपचार घेणाऱया रुग्णांनाही कोविड 19 चा तपासणी अहवाल जलदगतीने मिळणार असल्याने याचा फायदा होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.