दुपारी 3 वाजता आंचिमचा उद्घाटन सोहळा,अभिनेता सुदीप संजीव, मंत्री प्रकाश जावडेकरांची उपस्थिती
प्रतिनिधी / पणजी
लख्ख दिव्यांचा झगमगाट, नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक कलाकृती, मनभावक मयुररुपी बोधचिन्ह, विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दिलखेचक कमानी आणि प्रवेशद्वारे यांच्या साक्षीने आजपासून पणजीत मायानगरी अवतरणार आहे. भारताच्या 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त ही सर्व तयारी करण्यात आली असून पुढील 9 दिवस देशविदेशी सिनेरसिक, दिग्गज सितारे आणि अन्य चित्रपट कलाकार पणजीत दिसणार आहेत. तब्बल 60 देश या महोत्सवात सहभागी होणार असून इटालियन सिनेमाटोग्राफर व्हिट्टोरिओ स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यंदाचा हा चित्रपट महोत्सव हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून आज दि. 16 रोजी दुपारी 3 वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा होईल. त्यावेळी दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता सुदीप संजीव यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय सूचना व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनामुळे यंदा प्रेक्षक व सिनेरसिकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सायं. 7 वा. कला अकादमीत डॅनिश फिल्ममेकर थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘द अनादर राऊंड’ या चित्रपटाने आंचिमचा पडदा उघडेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
’मेहरुनिसा’ चित्रपटाचा जागतिक प्रेमियर
फिझीकल स्क्रीनिंगसाठी गोवा मनोरंजन सोसायटीचे चार मल्टिप्लेक्स, मॅकेनिज पॅलेसमध्ये दोन क्रीन आणि कला अकादमीतील एका क्रीनवर चित्रपट दाखविण्यात येतील. प्रत्यक्षरित्या सुमारे 190 स्क्रीनिंग होणार असून त्यातील सुमारे 85 चित्रपटांचे प्रेमियर होणार आहेत. त्याशिवाय ’मेहरुनिसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रेमियर होणार आहे.
यंदाचा आंचिम ठरणार ई महोत्सव
दि. 24 रोजी ’व्हाईफ ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने आंचिमचा समारोप होईल. उद्घाटन आणि समारोप हे दोन्ही सोहळे ऑनलाईन पद्धतीनेही पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ई-तिकीट, ई-फेस्टिव्हल पॅटलॉग, ई- शेडय़ूल, ई-पिकॉक यासारख्या व्यवस्थेमुळे यंदाचा आंचिम ’ई-महोत्सव’ होणार आहे. महोत्सवासाठी आतापर्यंत 2258 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.
16 विभागात 190 चित्रपटांची मेजवानी
इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, होमेज, रेट्रोस्पेक्टिव्ह, सत्यजित रे श्रद्धांजली विभाग, मिडफेस्ट, गोमंतकीय विभाग, स्पेशल स्क्रीनिंग, उद्घाटन व समारोपाचा चित्रपट, कंट्री फोकस, असे 16 विभागातील 190 चित्रपट सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहेत.
कोरोनामुळे उपस्थिती, कार्यक्रमावंर मर्यादा
दरम्यान, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे सोहळय़ात उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली असून मर्यादित 200 जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याशिवाय महोत्सवातील कार्यक्रमांवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेस मुख्यमंत्र्यांसोबत मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि माहिती सचिव अमित सतिजा यांची उपस्थिती होती.