मुंबई \ ऑनलाईन टीम
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला असून कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं असून सुवर्णअक्षरात लिहिलं जाईल अशी कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा ५-४ फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं. भारतीय संघावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हॉकी संघाला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर जयंत पाटील यांच्या या हटके शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, तुम्ही टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 41 वर्षांची प्रतिक्षा.. प्रयत्न… परिश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने ही नवी सुरुवात ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.