स्पर्श होताच होतो स्फोट : लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याकडून हस्तगत
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी शासकीय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. तसेच या दहशतवाद्याकडून परफ्यूम बॉम्ब हस्तगत करण्यात आला आहे. या परफ्यूम बॉम्बला कुणी स्पर्श केला असता तरी याचा स्फोट झाला असता असे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले.
जम्मूच्या नरवाल भागात झालेल्या आयईडी स्फोटांमागील रहस्याची पोलिसांनी उकल केली आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार रियासी येथील रहिवासी आरिफला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी म्होरक्याच्या निर्देशावर आरिफने हे स्फोट घडवून आणले होते. आरिफ हा सरकारी शाळेत शिक्षक असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी दिली आहे.
21 जानेवारी रोजी 20 मिनिटांच्या कालावधीत दोन स्फोट घडवून आणले गेले होते. अधिकाधिक जीवितहानी घडवून आणण्याचा दहशतवाद्याचा कट होता. पहिल्या आयईडी स्फोटत 9 जण जखमी झाले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने सखोल तपास केल्यावर दहशतवादी आरिफला ताब्यात घेतले आहे. आरिफ हा तीन वर्षांपासून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.
फेब्रुवारी 2022 मध्ये शास्त्राrनगर येथे झालेल्या आयईडी स्फोटातही आरिफचाच हात होता. कटरा येथील बसमध्ये आयईडी पेरून त्यानेच स्फोट घडवून आणला होता. दहशतवाद्याकडून पहिल्यांदाच परफ्यूम आयईडी हस्तगत करण्यात आले आहे. यापूर्वी अशाप्रकारची आयईडी कधीच हस्तगत झाली नव्हती. परफ्यूम आईडीला कुणी स्पर्श केला असता तर मोठा स्फोट झाला असता. या आयईडीला विशेष पथक निष्क्रीय करणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
शांतता भंग करण्याचा कट
पाकिस्तान स्वतःच्या भूमीतून दहशतवाद फैलावण्यासाठी आणि जगभरात शेकडो निर्दोष लोकांची हत्या करण्यासाठी कुख्यात आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा कट पाकिस्तान रचत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांदरम्यान एक सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे.
सरकारी शाळेतील शिक्षकाचा हात
नरवाल भागात दोन आयईडी स्फोट घडवून आणणारा मुख्य आरोपी आरिफ हा सरकारी शाळेत शिक्षक आहे. 2016 मध्ये आरिफला शिक्षण विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली होती. तर दहशतवादी आरिफचा नातेवाईक पाकिस्तानच्या कराची शहरात वास्तव्यास आहे. तसेच आरिफच्या गावातील रहिवासी अन् अन्य दहशतवादी कासिम देखील सध्या पाकिस्तानात आहे. आरिफ हा 2019 पासून कासिमच्या संपर्कात आहे. कासिमच्या निर्देशावरच आरिफने कटरा येथून वैष्णोदेवीच्या दिशेने जात असलेल्या बसमध्ये आयईडी पेरून स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 4 जणांना जीव गमवावा लागला होता. जम्मूच्या शास्त्राrनगर आणि नरवालमध्ये त्यानेच स्फोट घडवून आणले होते. मागील दोन वर्षांमध्ये आरिफने तीन स्फोट घडवून आणले आहेत. त्याच्याचकडून परफ्यूम आयईडी हस्तगत करण्यात आला आहे.