जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी घेतली बैठक : खासगी वाहने रस्त्यावर उतरविण्याची तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 7 एप्रिलपासून संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी रविवारी आपल्या कार्यालयात बैठक घेतली. संपाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
खासगी वाहनमालकांची बैठक घेण्यात आली आहे. जर दि. 7 एप्रिलपासून परिवहन कर्मचाऱयांनी संप सुरू केला तर खासगी वाहने रस्त्यावर उतरविण्याची तयारी प्रशासनाने केली असून यासाठी त्यांना तात्पुरते परमीट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 7 एप्रिलपासून खासगी बस, टेम्पोंना तात्पुरते परमीट देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी परिवहनच्या अधिकाऱयांना केली आहे.
बस, टेम्पो इतकेच नव्हे तर गरज पडल्यास इतर वाहनांनाही परमीट देऊन त्या नागरिकांच्या सेवेस जुंपण्यात येणार आहेत.
संप काळात जर खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याचे आढळून आले तर अशा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला असून संप काळात खासगी वाहनचालक-मालकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारच्या सूचनेवरून सर्वसामान्य नागरिकांना संपामुळे त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक सेवा पुरविण्याची तयारी खासगी वाहनमालकांनी दर्शविली आहे. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रणाधिकारी एम. आर. मुंजी, आरटीओ शिवानंद मगदूम, चिकोडी येथील परिवहन अधिकारी भीमनगौडा पाटील, बैलहोंगलचे एआरटीओ नागेश मुंडास, रामदुर्गचे एआरटीओ धर्मराज पवार, गोकाकचे एआरटीओ हेमावती आदी अधिकारी उपस्थित होते.