विनोदी व्हिडिओंच्या माध्यमातून जागृतीः ‘तरुण भारत’ला दिली खास मुलाखत
प्रसाद सु. प्रभू / बेळगाव
बेळगाव ही कलाकारांची खाण आहे. इथल्या मातीतले कलाकार परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर सर्वदूर चमकले. असाच एक कलाकार अर्थात बेळगावचा पिंटू सध्या आपल्या व्हिडिओंच्या जोरावर धमाल करतोय. ग्रामीण मराठी भाषेचा वापर करून आपली कला मांडणाऱया या पिंटूची जादू सर्वदूर पसरत आहे. त्याने बनविलेले व्हिडिओ विनोदी तर ठरताहेतच शिवाय समाजातील एका दुखऱया बाजूवरही बोट ठेवणारे ठरत आहेत. तरुण भारतने विशेष मुलाखत घेऊन हा पिंटू नेमका आहे तरी कसा? हे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
बेळगावच्या पिंटूचे नाव आहे लखन खादरवाडकर. भवानीनगर परिसरात तो राहतो. आई-वडिलांनी कष्ट करून त्याला शिकविले. ठळकवाडी हायस्कूलमध्ये दहावी, भरतेशला आयटीआय आणि पुढे वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये त्याने डिप्लोमा केला. लहानपणापासूनच अभिनय, गायन, नृत्य आणि विनोद यांची आवड असल्याने लखनने मुंबई गाठली. अभिनेते अनुपम खेर यांच्या अकॅडमीत त्याने अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले, अन् लॉकडाऊनमुळे तो बेळगावला आला. घरी बसून वर्क फ्रॉम होम करता करता त्याच्यातील कलाकार स्वस्थ बसत नव्हता. येथूनच त्याचा व्हिडिओ बनविण्याचा प्रवास सुरू झाला.
मंडोळी रोडवर उपेक्षितपणे पडून राहिलेले लष्करी रणगाडे त्याने पाहिले. तेथे पसरलेला कचरा, दारूच्या बाटल्या या प्रश्नावर त्याने लक्ष वेधले. तो आणि त्याचा विषय जागू लागला आणि त्याला पुढे याच क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.
गवंडी मामा, भाजीवाला यासारख्या व्यक्तींचे चित्रण करून व्हिडिओ करण्याचा सपाटाच त्याने सुरू केला आहे. आपल्या स्थानिक बोली भाषेला एक वेगळे महत्त्व प्रस्थापित करून देण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शहराची एक वेगळी भाषा असते. आपल्या बेळगाव परिसरातही वैशिष्टय़पूर्ण भाषा बोलली जाते. या भाषेत काहीतरी करण्याची जिद्द घेऊन आपली वाटचाल सुरू आहे, अशी माहिती त्याने दिली.
भगत-2020 ही शॉर्ट फिल्म त्याने बनविली आहे. त्याचे स्वत:चे यू-टय़ूब चॅनेल आहे. याच बरोबरीने भविष्यात शॉर्ट फिल्म्स बनविणे, वेब सिरीज बनविणे आणि स्वत: अभिनयाच्या क्षेत्रात चमकणे हे त्याचे स्वप्न आहे. या क्षेत्रात येणाऱयांना राबल्याशिवाय कायबी मिळत न्हाय! असं तो सांगून जातो. गावंढळ म्हणून अव्हेरल्या गेलेल्या मात्र ग्रामीण बोली भाषेचं प्रतीक असलेल्या बेळगावच्या भाषेला घेऊन हा मातीतला कलाकार पुढे पुढे जात आहे.