प्रतिनिधी / सातारा :
गोडोली येथे सांयकाळच्या वेळी पाईपलाईनच्या कामावरुन दोन गटात जोरदार राडा झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. हा वाद नेमका कशावरुन सुरु होता याबाबत काहीच कळत नव्हते. मात्र वादाला पाईपलाईनच्या कामाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. ही घटना पोलिसांना कळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या प्रकारानंतर दोन्ही गटातील युवक व समर्थक सातारा शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत काही नोंद नव्हती.
प्राथमिक माहितीनुसार गोडोली येथे गटर तुंबत असल्याने नव्याने गटरचे काम करण्यात यावे, अशी मागणी तेथील नागरिकांनी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांच्याकडे केली होती. मोरे पाटील यांनी हे काम मंजूर करुन आणले आणि कामालाही सुरुवात करण्याकरता ठेकेदाराने पाईप आणून टाकल्या. जेसीबीने जुने गटर खोदण्याकरता मापेही घेतली. तर काही दुकानदारांनी गटारावर स्लॅब टाकला आहे तो उचकटून पुन्हा त्याखाली पाइं&प टाकून सुस्थितीत करण्याबाबत कामकाज करण्यास प्रारंभ करण्यापुर्वीच तेथील एका व्यावसायिकांनी त्या ठेकेदाराशीच भांडण सुरु केले. त्यातून सुरु झाल्यानंतर अफवांचे पिक पसरत गेले.
दरम्यान, काम बंद पडल्याची माहिती मिळताच नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी चांगल्या कामाला अडथळा येत असल्याने थेट त्या ठेकेदाराच्या मदतीला धावून गेले. तर व्यावसायिकाने त्याला मारहाण झाल्याची तक्रार करत सीसीटीव्ही फुटेजसह शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या सगळय़ात दोन्ही बाजुने आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत या राडय़ाबाबत शहर पोलीस ठाण्यात काहीही नोंद नव्हती.