वृत्तसंस्था/ गयाना
शनिवारी येथे झालेल्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकने दुसऱया सामन्यात यजमान विंडीजचा 7 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. शानदार गोलंदाजी करणाऱया पाकच्या मोहम्मद हाफीजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. हाफीजने आपल्या चार षटकांत केवळ 6 धावा देत एक गडी बाद केला. पाकतर्फे कर्णधार बाबर आझमने अर्धशतक तर मोहम्मद रिझवानने 46 धावा जमविल्या. 33 चेंडूत नाबाद 62 धावा फटकावणाऱया विंडीजच्या पूरनचे प्रयत्न मात्र अपुरे पडले.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. आता या मालिकेतील तिसरा सामना रविवारी येथे खेळविला जात आहे. शनिवारच्या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकांत 8 बाद 157 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकांत 4 बाद 150 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 7 धावांनी गमवावा लागला.
पाकच्या डावाची शार्जिल खान आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार सुरूवात करताना 28 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. होल्डरने शार्जिल खानला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची भर घातली. रिझवानने 36 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 46 तर बाबर आझमने 40 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. झमानने 11 चेंडूत 2 चौकारांसह 15, मोहम्मद हाफीजने 10, मसूद 5, शदाब खानने 5 धावा जमविल्या. पाकच्या डावात 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डरने 26 धावांत 4 तर ड्वेन ब्रॅव्होने 24 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्त्युरादाखल खेळताना विंडीजच्या पूरनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 36 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकविल्या, पण पुरनचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. पाकच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. सलामीचा फ्लेचर खाते उघडण्यापूर्वै मोहम्मद हाफीजच्या पहिल्याच षटकांतील दुसऱया चेंडूवर त्रिफळाचीत झाला. लेवीसने 33 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावा जमविल्यानंतर दुखापतीमुळे तो निवृत्त झाला. ख्रिस गेलने 20 चेंडूत 1 षटकारांसह 16, हेतमेयरने 18 चेंडूत 1 चौकारांसह 17, कर्णधार पोर्लाडने 14 चेंडूत 13 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 9 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद हाफीज, शाहीन आफ्रिदी, हसन अली आणि मोहम्मद वासीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजला शेवटच्या षटकांत विजयासाठी 30 धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदीने कर्णधार पोलार्डला पहिल्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर पूरनने पुढील तीन चेंडूवर काही फटके मारले. पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. विंडीजच्या डावात 47 चेंडू निर्धाव राहिले.
संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकांत 8 बाद 157 (बाबर आझम 51, रिझवान 46, शार्जिल खान 20, फक्र झमान 15, मोहम्मद हाफीज 6, मसूद 5, शदाब खान 5, होल्डर 4-26, ड्वेन ब्रॅव्हो 2-24), विंडीज 20 षटकांत 4 बाद 150 (पूरन नाबाद 62, लेवीस 35, गेल 16, हेतमेयर 17, पोलार्ड 13, मोहम्मद हाफीज 1-6, शाहीन आफ्रिदी 1-44, हसन अली 1-32, मोहम्मद वासीम 1-32).