ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारताच्या राफेलशी सामना करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून 25 जे-10 सी लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारचे मंत्री शेख रशीद यांनी पुढील वषी मार्चपर्यंत 25 चिनी लढाऊ विमाने पाकिस्तानच्या ताफ्यात सामील होतील, अशी माहिती दिली होती. तथापि, पाकिस्तानी खासदार डॉ. अफनान उल्लाह यांनी भारताचे राफेल हे जे-10 सी पेक्षा अधिक शक्तीशाली असल्याचे म्हटले आहे.
डॉ. अफनान उल्लाह यांनी म्हटले आहे की, चेंगडू या चिनी विमान उद्योगाने बनवलेल्या जे-10 सी या विमानांपेक्षा राफेल विमानं अधिक शक्तीशाली आहेत. भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानांची खरेदी केली आहे. पाकिस्तानकडे असलेल्या एफ-16 विमानांसारखीच जे-10 सी ही विमाने आहेत. मग चीनकडून जे-10 सी विमाने खरेदी करण्यामागचे पाक सरकारचे कारण मला समजत नाही.
दरम्यान, जे-10 सी मल्टी रोल फायटर विमान आहे. ही सीजे-10 ची नवीन आवृत्ती आहे. 2018 मध्ये ती पहिल्यांदा चिनी सैन्यात सामील झाली होती. तज्ञांच्या मते, जे-10 हे एकच इंजिन आणि हलके लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक हंगामात काम करण्यास सक्षम आहे. या विमानाची एक मोठी डेल्टा विंग आहे आणि अतिरिक्त स्थैर्य किंवा नियंत्रण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले दोन कॅनर्ड आहेत. ते कॉकपिटच्या मागे आहे. त्यात रशियन बनावटीचा मिग-29 आणि अमेरिकेने बनवलेला एफ-16 यांच्या बरोबरीने पेलोड आहे. जे-10 सी मध्ये चिनी बनावटीचं तैहांग इंजिन बसवण्यात आले आहे