वडिलांना पाहताच मुलांच्या डोळ्यांतून आले आनंद अश्रू
प्रतिनिधी / कुर्डुवाडी
लऊळ ता.माढा येथील सत्यवान निवृत्ती भोंग (वय-४०) याचे मानसिक स्वाथ्य हरविल्याने ते पुण्यात दहा वर्षांपूर्वी आपल्या पत्नीबरोबर आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यात गेलं असता पत्नीच्या हाताला झटका मारून पळून गेले होते.त्यानंतर त्यांचा तपास लागला नाही. नंतर पाकिस्ताच्या सीमेवर तो आढळून आला. यावेळी पाकिस्तानच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले व कारागृहात ठेवले होते. तो भारतीय असल्याचा तपासतात समोर येताच त्यानी अमृतसर येथील भारतीय जवानांच्या ताब्यात दिले. भारतीय जवानांच्या तपासात लऊळ येथील असल्याचे समोर येताच त्यांनी कुर्डुवाडी पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन जाण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांचे एक पथक शनिवारी पहाटे रेल्वेने त्याच्या पुतण्याला सोबत घेऊन अमृतसर येथे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. तिथे त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करून पोलीस पथकाने ताब्यात घेतले व तब्बल सहा दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान पथक कुर्डुवाडीत दाखल झाले व थेट त्याची येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून पुतण्या गणेश भोंग यांच्या ताब्यात त्याला दिले. घरी पोहचताच संपूर्ण कुटुंबाने एकच जल्लोष केला. मुलांच्या डोळ्यात आपल्या बेपत्ता असलेल्या वडिलांना दहा वर्षांनंतर पाहून डोळ्यांतून आनंद अश्रू अनावर झाले. व मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.