कोरोना संकटातही धर्मांधता : केवळ मुस्लिमांना धान्याचे वाटप
पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाचे 1625 रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटादरम्यान इम्रान खान सरकार रुग्ण आढळलेल्या भागांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. पण सिंध प्रांतात राहणाऱया अल्पसंख्याक हिंदुंसोबत प्रशासनाकडून भेदभाव केला जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून कराचीत लोकांना धान्य तसेच अन्य आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. परंतु हिंदूंना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही मदत तुमच्यासाठी नसून केवळ मुस्लीम समुदायासाठी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सिंधमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे.
सिंध प्रांतात टाळेबंदीच्या दरम्यान अडकलेल्या मजूर आणि कामगारांसाठी धान्यवाटपाची जबाबदारी सरकारने प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांना दिली आहे. तेथे सुमारे 3 हजार लोक मदतीसाठी जमले होते. या लोकांच्या आरोग्य तपासणीची कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदाय म्हणजेच हिंदू लोकसंख्येसमोर प्रशासनाच्या भेदभावामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.
कराची शहर आणि सिंध प्रांताच्या विविध भागांमध्ये राहणाऱया हिंदूंसमोर अन्नाचे गंभीर संकट उद्भवले आहे. तेथील हिंदू आता भारत सरकारला मदतीचे आवाहन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमार्गे सिंधमधील हिंदूंसाठी धान्य तसेच अन्य आवश्यक सामग्री पाठवावी अशी त्यांची मागणी आहे.