प्रतिनिधी/ सातारा
गेल्या पाच दिवसांपासून रविवार पेठेतील सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी, कैकाडी गल्लीला पाणी टंचाई भेडसावत आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे आज ऑन फिल्ड होत्या. त्यांनी आज रविवार पेठेतल्या त्या भागाला पाणी पुरवठा करणाऱया व्हॉल्व्हचे काम करण्याबाबत सुचना देवून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी केली. त्यांना व्हॉल्व्हबाबत माजी पाणी पुरवठा सभापती व नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी माहिती दिली.
पाणी पुरवठय़ाच्या सभापती सीता हादगे यांनी पदभार घेतल्यानंतर केवळ खुर्चीत बसून काम करायचे नाही तर लोकांच्यात मिसळून नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार लोकांच्यासाठी जनतेसाठी काम करायचे आहे, असा विडाच उचलला आहे. शहरातील कोणत्याही भागाला पाण्याची समस्या भेडसावू द्यायची नाही यासाठी प्रयत्नशील रहायचे आहे, यासाठी त्यांनी पहिल्याच दिवसांपासून कामाला प्रारंभ केला आहे. त्यामध्ये रविवार पेठेतल्या सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी, कैकाडी गल्लीत पाच दिवस पाणी टंचाई भेडसावत असल्याने तेथे टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी पुरवठा सुरुळीत होण्यासाठी आज नेमकी समस्या कोठे झाली आहे त्याची दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या अन् कामास प्रारंभ केला. जेसीबीच्या सहाय्याने कामाला प्रारंभ केला आहे. यावेळी माजी पाणी पुरवठा सभापती नगरसेवक श्रीकांत आंबेकर तसेच नगरसेविका सविता फाळके यांनी माहिती दिली. पाणी पुरवठा विभागाचे संदीप सावंत, तारकेश्वर बावणे आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांना सुचना दिल्या. ही समस्या कसल्याही परिस्थितीत काढा, नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले.