वृत्तसंस्था/ काबूल/तेहरान
अफगाणिस्तान आणि इराणचे सैन्य रविवारी सीमेवर परस्परांना भिडले आहे. दोन्ह देशांदरम्यान इस्लामिक रिपब्लिक बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे. ही लढाई इराणच्या सिस्तान आाणि बलुचिस्तान प्रांत तसेच अफगाणिस्तानच्या निमरोज प्रांताच्या सीमेवर झाली आहे. यात तालिबानचा एक सदस्य तर इराणच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही देशांदरम्यान हेलमंड नदीच्या पाण्याच्या अधिकारावरून वाद आहे. तालिबानने प्रथम गोळीबार सुरू केल्याचा दावा इराणने केला आहे. तर या संघर्षाची सुरुवात इराणने केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. तालिबानी नेत्यांनी मंजुरी दिल्यास आम्ही 24 तासांत इराणवर विजय मिळवू असे तालिबानचे कमांडर हामिद खोरासानी यांनी म्हटले आहे.
ज्या उत्साहात आम्ही अमेरिकेच्या विरोधात लढलो होतो, त्याहून अधिक उत्साहाने आम्ही इराणविरोधात लढू. इराणने तालिबानी नेत्यांच्या संयमाचे आभार मानावेत. तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला अनुमती दिल्यास आम्ही इराणवर विजय मिळवू असे तालिबानी कमांडर अन् पक्तिया प्रांताचे माजी गव्हर्नर अब्दुल खोरासानी यांनी म्हटले आहे.
चोख प्रत्युत्तर देऊ : इराण
दुसरीकडे इराणने देखील तालिबानला लढाईत पराभूत करण्याचा संकल्प केला आहे. आमचे सुरक्षा दल प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्याप्रकरणी परिणाम भोगावे लागतील असे इराणचे पोलीस प्रमुख अहमदरजा रदान यांनी म्हटले आहे. सुमारे महिन्याभरापर्वी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी तालिबानला हेलमंड नदीत इराणच्या जल अधिकारांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता.
इराणच्या 97 टक्के भूभागात दुष्काळ
इराण मागील 30 वर्षांपासून दुष्काळसदृश स्थितीला सामोरा जात आहे, परंतु मागील काही वर्षांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. इराणमध्ये आता समारे 97 टक्के हिस्सा काही प्रमाणात दुष्काळाल सामोरा जात आहे. इराणमध्ये दरवर्षी 240 ते 280 मिलीलीटर पाऊस पडतो. जागतिक सरासरी 990 मिलिमीटरच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. इराणमध्ये जगातील एक टक्के लोकसंख्येचे वास्तव्य आहे, परंतु येथे शुद्ध पाण्याचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे.