प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळात सातारा पालिकेचे कर्मचारी निष्ठेने शहरवासियांसाठी काम करत आहेत. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवडयात मिळणारे वेतन दुसऱ्या आठवड्यातही मिळेना, अशी परिस्थिती गेली दोन महिने सुरु आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच कर्मचारी नाराज आहेत. सोमवारी पगार झाला नाही तर पालिकेचे कामकाज मंगळवारी बंद ठेवण्याच्या अनुषंगाने पालिका कामगार संघटनांची चर्चा सुरु आहे.
सातारा पालिकेत विविध विभागात सुमारे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना नियमित महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन दिले जाते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेकडूनच दिरंगाई होवू लागली आहे. गत महिन्यामध्ये पंधरा तारीख उटलून गेल्यानंतर वेतन दिले गेले. या महिन्यात दि.18 रोजीपर्यंत वेतन झाले नव्हते. पालिका कर्मचारी वेतन कधी होईल, याकडे कटाक्षाने नजरा लावून बसले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाची फी, कर्जाचे हप्ते, लाईट बील भरायचे आहे तसेच घरभाडे द्यायचे आहे, असे अनेक प्रश्न पगार नसल्याने उदभवले आहेत. सोमवारी जर पालिकेतून पगार जमा झाला नाही तर आंदोलन करण्याच्या तयारीत संघटना आहेत.
मंगळवारी पालिकेचे कामकाज बंद ठेवणार
सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही तर मंगळवारी पालिकेचे कामकाज बंद ठेवणार आहोत. पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले गेले पाहिजेत. – श्रीरंग घाडगे पालिका युनियन कर्मचारी संघाचे सरचिटणीस